पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरच्या अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा तणाव निर्माण झाला होता. ‘योजनेला पुन्हा नवीन दिनांक दिला, तर संतप्त जनता आम्हाला मारायलाही कमी करणार नाही’, अशी तीव्र भावना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त करत निष्काळजीपणा करणार्‍या अधिकार्‍यांना खडसावले. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील भोंगळ कारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमालीचा संताप व्यक्त केला. ८ ते १० दिवसांआड होणार्‍या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा रोष सहन करावा लागत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. बैठकीत कंत्राटदार आणि ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा’चे अधिकारी एकमेकांवर चिखलफेक करत असल्याने मुख्यमंत्र्यांचा संताप अनावर झाला. मुख्यमंत्री ७ दिवसांत पुन्हा या योजनेचा आढावा घेणार आहेत.