कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी

स्थानिक संस्थेकडून आयुक्तांना निवेदन !

कल्याण, १६ जुलै (वार्ता.) – ऐतिहासिक दुर्गाडी या गडालगतचा परिसर, उल्हास नदीचे पात्र आणि जुन्या कल्याण-भिवंडी पुलासमोरील जागा अनधिकृत अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याचा गंभीर आरोप ‘भूमीपुत्र धर्माभिमानी संघ सेवा संस्थे’ने केला आहे. दुर्गाडी ते कचोरेगाव जेटीपर्यंत उल्हास नदीच्या पात्रालगत खारफुटी आणि कांदळवन नष्ट करून नदीत भराव टाकण्यात आला आहे. या भरावावर म्हशींचे अनधिकृत तबेले, रहिवासी कच्ची-पक्की घरे, तसेच पत्र्यांचे व्यावसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. ऐतिहासिक कल्याण-भिवंडी ब्रिटी शकालीन पुलासमोरही अनधिकृत तबेले उभारण्यात आहेत. त्यामुळे पर्यावरणासह ऐतिहासिक वारशालाही धोका निर्माण झाला आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवून दोषींवर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी संस्थेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे संस्थेने केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून २७ मे २०२६ या दिवशी महानगरपालिकेला पाठवण्यात आलेल्या ई-मेलचा संदर्भ देत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि परिसर अतिक्रमणमुक्त करून त्याचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी भूमीपुत्र धर्माभिमानी सेवा संघाने केली आहे.

संपादकीय भूमिका

जे एखाद्या संस्थेला कळते ते प्रशासकीय यंत्रणा हाताशी असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना का कळत नाही ? कि कळून वळत नाही ?