मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !


पिंपरी (पुणे) –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी महापालिकेतील पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. कर्तव्यात निष्काळजीपणा, शासकीय कामात हलगर्जीपणा, अधिकारांचा अपलाभ करून अनधिकृत बांधकामास अभय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (टाकाऊतून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाच्या ३ मजली अनधिकृत इमारतीवर कचर्‍याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू होऊन १२ जण घायाळ झाले होते.

या प्रकरणी ‘अँटोनी लारा रिनिव्हेबल एनर्जी’ या आस्थापनाला ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली होती. तसे न केल्यास कंत्राट रहित करून अधिकोष हमी जप्त करण्याची चेतावणी आयुक्तांनी दिली होती. त्याला अनुसरून आस्थापनाने १४ जुलै या दिवशी स्पष्टीकरण दिले. या घटनेशी संबंधित महापालिकेचे अधिकारी कुलकर्णी आणि आल्हाट यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली होती. दोघांनी दिलेले खुलासे असमाधानकारक, तथ्यहीन आणि शासकीय, तसेच महापालिका नियमांचे उल्लंघन करणारे होते. असे खुलासे अमान्य करत आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली.