वसईतील कोळीवाड्यांना गावठाणचा दर्जा देणार ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – वसई तालुक्यातील कोळीवाड्यांना अधिकृत गावठाण दर्जा देण्याची प्रक्रिया तातडीने चालू करावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. कोळीवाडा आणि गावठाण परिसरातील १ जानेवारी २०११ पूर्वीची १ सहस्र ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी बांधकामे नियमित करण्यात यावीत, याविषयी १५ जुलै या दिवशी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला आमदार स्नेहा दुबे पंडित आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

अनेक कोळीवाड्यांच्या सीमांची स्पष्ट नोंद नसल्याने अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या स्थानिक रहिवाशांच्या भूमींचा मालकी हक्क सध्या ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’कडे आहे. याविषयी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘या अडचणी दूर करून गावठाण घोषित करण्यापूर्वी संबंधित कोळीवाड्यांचे योग्य सीमांकन करून भूमी अभिलेख विभागाद्वारे त्यांची तातडीने मोजणी करण्यात यावी. गावठाण, तसेच कोळीवाड्यातील रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरांची मालकी मिळवून देण्यासाठी तिथल्या घरांच्या भूमी संबंधित धारकांच्या (रहिवाशांच्या) नावे करण्याविषयी सकारात्मक पावले उचलली जातील.’’