नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’


मुंबई, १६ जुलै (वार्ता.) –
नक्षली कारवायांमुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या गडचिरोलीतील अतीदुर्गम आणि जंगलव्याप्त भागात २२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ चालू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे या भागामध्ये सामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय सुविधा पोचवणे कठीण होते. अशा भागामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन करणे म्हणजे एकप्रकारे नक्षली चळवळ कमकुवत झाल्याचे द्योतक आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना छोट्या-छोट्या शासकीय कामासाठी तालुका किंवा जिल्हा स्तरावर जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा जात होता, तसेच नागरिकांना मोठी पायपीटही करावी लागते. ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ चालू झाल्यावर शासकीय सेवा जवळच उपलब्ध होणार आहेत. याविषयी १६ जुलै या दिवशी शासन निर्णय काढण्यात आला आहे.