लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !

लोकलगाड्या आणि रेल्वेस्थानक परिसरात आक्रमणांच्या घटनांत वाढ !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – परळहून अंबरनाथला जाणार्‍या लोकलगाडीच्या डब्यात आसनावर बसण्यावरून २ प्रवाशांमध्ये वाद झाला. लोकल ठाकुर्ली रेल्वेस्थानकात प्रवेश करत असतांना त्यातील एका प्रवाशाच्या साहाय्याला आलेल्या तिघांनी दुसर्‍या प्रवाशावर लोखंडी कड्याद्वारे आक्रमण केले. परस्परांत झालेल्या आक्रमणात ३ जण घायाळ झाले. ही घटना ठाकुर्ली रेल्वेस्थानकावर मध्यरात्री १२ वाजता घडली. घायाळ झालेल्या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात भरती केले. आक्रमणकर्ते ठाकुर्ली स्थानकावर उतरून पसार झाले.

अन्य एका घटनेत चर्चगेट-विरार लोकलगाडीत पुरुषांच्या डब्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे. समाजमाध्यमांवर मुंबई लोकल गाड्यांमधील गर्दीचा प्रवास आणि प्रवाशांचा वाढता मानसिक तण, यांविषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांतील आक्रमणांच्या घटना

२३ जून या दिवशी रेल्वेच्या डब्यात मयंक लोहार या २२ वर्षीय तरुणाची क्षुल्लक कारणावरून चाकू भोकसून हत्या करण्यात आल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या बाहेर एकाने लोकांवर धारदार कोयता उगारल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर माहिममध्येही स्थानकाच्याबाहेर एकावर चाकूने आक्रमण केल्याची घटना घडली होती. दादर स्थानकावर एक जण एका महिलेला बेदम मारहाण करत असल्याची घटनाही नुकतीच घडली.

संपादकीय भूमिका

सर्वसामान्यांसाठी आता लोकल प्रवासही सुरक्षित नाही ! पोलिसांना हे लज्जास्पद !