हिंदु राष्ट्र- जागृती सभा विशेष !
सभेत हिंदुत्वाचा प्रखर नाद घुमला ।
कान्हादेशात हिंदु राष्ट्राचा जयघोष दुमदुमला ।।
जळगाव सभेतील मान्यवर वक्त्यांची भाषणे हिंदुत्वाचे स्फुलिंग चेतवणारी आणि ओजस्वी ठरली !

हिंदूंना लक्ष्य करणारी व्यवस्था धर्मनिरपेक्ष कशी ? – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ साम्यवाद्यांच्या षड्यंत्राचे शिकार होत आहेत. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले सनातनचे साधक समीर गायकवाड यांचे दुर्दैवी निधन झाले. या प्रकरणात त्यांना नाहक अटक करण्यात आली. हत्या करणारे दुचाकीस्वार अन्य असल्याचे समोर आले; परंतु यामध्ये त्यांना नाहक १९ मास कारागृहात डांबण्यात आले. माध्यमांनी त्यांनी अपकीर्ती केली. त्यामुळे त्यांचे सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त झाले. समीर यांचा मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेली हत्या होय.
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाच्या न्यायमूर्तींनी शोक व्यक्त केला होता. संयुक्त राष्ट्रांनी शोक व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक काढले; परंतु समीर यांच्यासाठी कोण उभे रहाणार आहे का ? पुरोगाम्यांविषयी सहानुभूती दाखवणारी; परंतु हिंदूंना लक्ष्य करणारी व्यवस्था धर्मनिरपेक्ष कशी ? भारतातच नव्हे, तर बांगलादेशातही हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. युरोपमध्येही हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. सनातन संस्कृती नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होत आहेत. हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली, तर धर्मनिरपेक्षता आठवते; परंतु मुंबईतील पडघा गाव इस्लामिक स्टेटचे केंद्र बनण्यावर त्यांना आक्षेप नसतो. धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी वेळीच संघटित व्हावे.
‘धर्माच्या रक्षणासाठी लढ’, हाच श्रीकृष्णाचा संदेश ! – लेफ्टनंट कर्नल मनोज सिन्हा (निवृत्त)

द्वापरयुगात भगवान श्रीकृष्ण होते. ‘कलियुगात पांडवांच्या मार्गाने जाणार्यांना मार्गदर्शन कोण करणार ?’, असे वाटण्याची आवश्यकता नाही; परंतु भगवंताला जे सांगायचे होते, ते त्याने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. ‘अधर्माचा नाश करण्यासाठी धर्मयुद्धाचा स्वीकार कर’, हाच श्रीकृष्णाचा संदेश आहे; कारण रासलीला करण्यासाठी किंवा बासरी वाजवण्यासाठी नव्हे, तर ‘जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी मी स्वत: अवतार घेतो’, असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी लढणे, हेच सर्वश्रेष्ठ युद्ध आहे, यापेक्षा कोणतेही पवित्र कार्य नाही. त्यामुळे आजही कौरव असतील, तर आपल्याला त्यांनी धर्मयुद्धाची संधी दिली आहे, याविषयी भगवंताप्रती कृतज्ञ रहावे; कारण धर्मयुद्धातूनच मोक्षप्राप्ती होते.
धर्मलढ्यासाठी आपापल्या परीने योगदान द्या !
आपण छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्याप्रमाणे होऊ शकत नसलो, तरी इतिहास केवळ नायक आणि खलनायक यांच्यामुळे बनत नाही, तर त्यांच्यासमवेत असणार्यांचाही इतिहासात समावेश असतो. छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांना लढण्यासाठी साहाय्य करणारे, हिंदवी स्वराज्यासाठी दान देणारे, घायाळ मावळ्यांवर औषधोपचार करणारे, त्यांना अन्न देणारे, विश्रांतीची व्यवस्था करणारे त्यांच्याप्रतीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असती. दुर्बुद्धी मोठी असेल, तर सद्बुद्धी त्याहूनही मोठी करा.
इतिहास पराक्रमाला लक्षात ठेवतो !
इतिहासात अनेक सत्यवादी लोक होऊन गेले; परंतु इतिहास नेहमी शक्तीसमवेत असतो. प्रभु श्रीरामाला मर्यादापुरुषोत्तम, सत्यवादी, क्षमाशील म्हणून आपण ओळखतो; परंतु राक्षसांना नष्ट केल्यामुळे त्याची ओळख आहे. त्राटिकेसमवेत झालेल्या पहिल्या युद्धातच त्याचा पराभव झाला असता, तर त्यांना कुणी लक्षात ठेवले असते का ? धर्मयुद्धासाठी आपल्यामध्ये पराक्रम आणि शक्ती असायलाच हवी. लहान मुलांची श्रीकृष्णाप्रमाणे वेशभूषा करतांना त्यांच्या हातात बासरी नव्हे, तर सुदर्शनचक्र द्या; कारण भगवान श्रीकृष्ण प्रथम योद्धा होते.
धर्म-अधर्म यांच्या युद्धात खंबीरपणे धर्माचीच बाजू घ्या !

महाभारताच्या युद्धापूर्वी बलराम निष्पक्ष भूमिका घेऊन तीर्थयात्रेला गेले. भीमाचा नातू बर्बरी याने महाभारताच्या युद्धात कुणी दुर्बल होईल, त्याला साथ देण्याची भूमिका घेतली. धर्मयुद्धाविषयी अशा प्रकारे संभ्रमित होऊ नका. ज्या वेळी धर्म-अधर्म याचा प्रश्न येईल, तेव्हा खंबीरपणे धर्माचीच बाजू घ्या. भरताचे प्रभु श्रीरामावर सर्वाधिक प्रेम होते; परंतु श्रीरामासमवेत पहिले नाव लक्ष्मणाचे घेतले जाते; कारण धर्मयुद्धामध्ये लक्ष्मणाने श्रीरामाची साथ दिली.
हिंदूंनो, धर्मलढ्यासाठी साधना करा !
श्रीकृष्ण चक्रव्यूहाची गोष्ट सांगत असतांना सुभद्रा झोपली होती; पण निद्रा त्यागून तिने युद्धकथा ऐकायला हवी होती; कारण निद्रेच्या बदल्यात भविष्यात तिला अभिमन्यूला गमवावे लागले. त्यामुळे हिंदु माता-भगिनींनी पाल्यांना पराक्रमी बनवावे. आपणाला गुंड नव्हे, तर धर्मयोद्धा व्हायचे आहे. भगवंताच्या मार्गदर्शनानुसार लढणारा धर्मवीर होतो. यासाठी साधना करा.
छत्रपती शिवराय यांचा आदर्श मावळा होण्याचे उद्दिष्ट ठेवा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

हनुमान लंकेमध्ये सीतामातेला आश्वस्त करण्यासाठी गेले होते; परंतु त्यांनी शत्रूच्या मनात भय निर्माण केले. मारुतिरायांप्रमाणे बळ निर्माण होण्यासाठी हिंदूंनी मंदिरांत येऊन सामूहिक उपासना करायला हवी. हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आंदोलनात सहभागी व्हावे. राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मावळा व्हायला हवे. वर्षभरात आदर्श मावळा होण्याचे उद्दिष्ट ठेवूया. सामूहिक उपासनेसाठी हिंदू एकत्र आल्यास मतभेद दूर होऊन हिंदूंमध्ये फूट पाडणे अशक्य होते. संघटनातूनच हिंदूंच्या भावनांना मूल्य प्राप्त होईल.
हिंदुहिताचे निर्णय घेतले जावेत, यासाठी संघटित व्हा !
१. लोकशाहीच्या नावाखाली व्यवस्था पायदळी तुडवली जात आहे.
२. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंचे आराध्य दैवत ‘प्रभु श्रीराम मांसाहारी होते’, असे वक्तव्य केले होते. त्याविषयी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला; मात्र सरला बेटाचे महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात ६७ गुन्हे नोंदवण्यात आले. यातून लोकशाही देशात दबावाखाली गोष्टी घडतात, असेच दिसून येते.
३. हिंदूंनी दबावनीतीचा उपयोग करावा. गावापासून देहलीपर्यंत हिंदुहिताचे निर्णय घेतले जावेत, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे.
हे वाचा → जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष ! |
असा झाला जळगाव सभेचा सर्वांगस्पर्शी प्रसार !
१. ढोलपथकाद्वारे प्रसार !
जळगाव शहरातील पिंप्राळा, जुने जळगाव, कांचननगर, चौगुले प्लॉट, हरिविठ्ठल नगर, शनीपेठ या भागांमध्ये विविध संघटनांचे धर्मप्रेमी युवक आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ यांनी ढोलपथकाद्वारे सभेचा प्रसार केला. अशा प्रकारे परिसरात हस्तपत्रकांचे वितरण करून, हातात फलक घेऊन, उद्घोषणा करून १५ ते २० युवक एकाच वेळी परिसरातील शेकडो नागरिकांपर्यंत पोचले. या प्रसारकार्यात वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक धर्मप्रेमी डोक्यावर भगवी टोपी घालून सहभागी होत असत. याद्वारे चौकाचौकात प्रसार करण्यात आला. ‘हिंदूंनो, संघटित व्हा’, ‘हिंदू सुरक्षित, तर माझे करिअर सुरक्षित’, ‘हिंदू सुरक्षित, तर व्यापार सुरक्षित’ असे लक्षवेधी फलक हातात धरून सभेचा प्रसार करण्यात आला.
२. नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधी यांचा प्रसारात सहभाग !
हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे लोकप्रतिनिधी नगरसेवक डॉ. वीरन खडके, नगरसेवक विजय वानखेडे, नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, माजी नगरसेवक विठोबा चौधरी प्रसारात सहभागी झाले होते. स्वत: प्रभागात ढोलपथकासमवेत फिरून या लोकप्रतिनिधींनी सभेचा प्रसार केला. हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
३. अभ्यासिका आणि खानावळी येथे प्रसार करून विद्यार्थ्यांशी संवाद
सभेच्या परिसरातील अभ्यासिका आणि खानावळी येथे जाऊन सभेचे निमंत्रण देण्यात आले. परिणामी अनेक विद्यार्थीही सभेला उपस्थित होते.
४. दुकाने, रिक्शा यांवर भित्तीपत्रके लावली !
जळगाव शहरातील फुले मार्केट, गोलाणी मार्केट आदी गजबलेल्या भागांमध्ये सभेचा प्रसार करण्यात आला. अनेक दुकानदार आणि रिक्शाचालक यांनी दुकाने, तसेच रिक्शा यांवर भित्तीपत्रके लावली.
५. फलकलिखाण !
जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रकाश क्षीरसागर यांनी शहरात विविध ठिकाणी सभेच्या निमंत्रणाचे फलक लिहिले. फलकाद्वारे शेकडो जणांपर्यंत सभेचा प्रसार झाला.
६. प्रसारात उद्योजकांचा सहभाग !
येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमधील उद्योजकांची धर्मप्रेमी उद्योजकांनी संपर्क करून त्यांना सभेचे निमंत्रण दिले, तसेच त्यांना सभेसाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले.

पदफेरी आणि ध्वजपूजन !

जळगाव येथील सिंधी कॉलनी परिसरात धर्मध्वज घेऊन पदफेरी काढण्यात आली. त्यात पुष्कळ युवक डोक्यावर भगवी टोपी घालून सहभागी झाले होते. फेरीच्या अग्रभागी धर्मध्वज होता. फेरीच्या वेळी अनेक सुवासिनींनी धर्मध्वजाचे पूजन केले. या पदफेरीचे छोट्या सभेत रूपांतर झाले. या सभेला २०० जण उपस्थित होते.
सभेमुळे प्रभावित होऊन मान्यवरांनी गौरवलेली सभा !

आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, भाजप : कार्यक्रमाला उपस्थित राहून चांगले वाटले. हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा आहे, समस्त हिंदूंनी लक्षात ठेवायला हवे. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदे : धर्मरक्षणासाठी आवश्यक ती सेवा करण्यास मी सदैव तत्पर आहे.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर : हिंदु राष्ट्र-जागृती सभा म्हणजे राष्ट्रीय विचारांचे धन लुटण्याची संधी होय.
मान्यवर
प्रा. श्रीकांत रत्नपारखी : सभेचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध होते. समितीचे कार्य पाहून समितीचा उद्देश निश्चितच यशस्वी होईल.
अधिवक्ता प्रवीण शिंदे : लेफ्टनंट कर्नल मनोज सिन्हा (निवृत्त) त्यांनी मांडलेले विचार तेजस्वी होते. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून त्यांनी मांडलेल्या राष्ट्ररक्षणाचे कार्य निश्चितच पूर्ण होईल.
श्री. हिरालाल पाटील, आयकर निरीक्षक, धुळे : हिंदु टिकले, तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली, तर हिंदुत्व टिकेल. त्यामुळे हिंदूंनी जागृत होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
डॉ. नीळकंठ पाटील, अस्थीरोगतज्ञ, पाचोरा : समितीच्या माध्यमातून समाजात परिवर्तन होत आहे.
धर्मरक्षणाच्या निश्चयाने प्रभावित झालेले नगरसेवक !
सौ. उज्ज्वला बेंडळे : सर्व वक्त्यांचे विचार प्रेरणादायी होते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्हा सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे.
श्री. अमर जैन : हिंदू तरुण-तरुणींमध्ये धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांचे विचार ज्वलंत झाले पाहिजेत. सर्वांनी एकत्र येऊन हिंदु धर्म जपला आणि जगवला पाहिजे, हा विचार सभेमुळे दृढ झाला.
डॉ. चंद्रशेखर पाटील : हिंदुत्वनिष्ठांसाठी सभा धर्मकार्यासाठी स्फूर्ती देणारी आहे.
सौ. गायत्री राणे : हिंदूंनी स्वत:त काय पालट करावेत, हे सभेद्वारे समजले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होता आले, तर मी माझे भाग्य समजेन.
सौ. माधुरी बारी : हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक आहे. या सभेला उपस्थित रहाता आले, हे माझे सौभाग्य होय !
सौ. जयश्री पाटील : सर्वांनी एकत्र येऊन हिंदु धर्म जपला पाहिजे, हा विचार प्रत्येकाच्या मनात पोचला पाहिजे. हिंदू युवा-युवतींमध्ये धर्मरक्षणाचा विचार ज्वलंत व्हायला हवा.
श्री. विजय बांदल : हिंदूंनी मुलांना धर्मशिक्षण द्यावे आणि राष्ट्र-धर्म यांवरील आघातांचा सामना करण्यासाठी त्यांना सिद्ध करावे. हिंदूंनी स्वसंरक्षण शिकून घ्यावे. वक्त्यांच्या भाषणातून प्रभावित झालो.
श्री. कल्पेश सोनवणे : सभेला उपस्थित असलेल्या महिला या सभेतून बोध घेऊन पाल्यांवर चांगले संस्कार करतील !
श्री. दीपक सूर्यवंशी : युवकांना हिंदु धर्माविषयी जागृत करणे आवश्यक आहे. हे कार्य समिती करत आहे. मी समितीचा अत्यंत आभारी आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, सभेच्या माध्यमातून जागृत झालेल्या हिंदु अस्मितेतूनच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील व्हा ! |
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !