जळगावमध्ये हिंदूंची ऐतिहासिक एकजूट !

जळगाव, १ फेब्रुवारी (वार्ता.) – मस्तकावर टिळा लावून, हातात भगवा घेऊन आणि मुखाने ‘जय श्रीराम’चा घोष करत येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रावधी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष केला ! मान्यवर वक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे होण्याचे आवाहन केले आणि उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी धर्मकार्यात योगदान देण्याची प्रतिज्ञा करत त्याला प्रतिसाद दिला ! संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि विविध संघटनांचे धर्माभिमानी हिंदू, हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधी अन् समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या सहभागाने मानराज पार्क येथील श्रीराम मंदिर संस्थानाच्या मैदानात १ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समिती आयोजित या सभेत पद, पक्ष, संघटना भेदून सहस्रावधी हिंदूंनी हिंदुत्वाचा हुंकार भरला.
महामंडलेश्वर जनार्दनगिरि महाराज, सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती, तसेच लेफ्टनंट कर्नल मनोज सिंहा (निवृत्त), हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांची प्रमुख उपस्थिती व्यासपिठावर होती.
सभेच्या प्रारंभी श्री. विनोद मासरे यांनी शंखनाद केला. श्री गणेश आणि ग्रामदेवता प्रभु श्रीराम यांना वंदन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने सभेला प्रारंभ झाला. ‘प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस…’ या सर्वगुणसंपन्न उपाधीचा जयजयकार करत मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती सर्वश्री श्रीराम जोशी, महेंद्र जोशी आणि पराग जोशी या ब्रह्मवृंदांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर वेदमूर्ती आणि वक्ते यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

हिंदु राष्ट्राच्या नावाने कोल्हेकुई करणारे ‘मुंब्रा हिरवा करू’ म्हटल्यावर मात्र गप्प ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
हिंदु राष्ट्र स्थापनेचा उल्लेख केला, तरी हिंदुद्वेषी आणि पुरोगामी यांची कोल्हेकुई चालू होते. ‘मुंब्रा हिरवा करू’ म्हटल्यावर मात्र ही मंडळी गप्प आहेत. हिंदु राष्ट्र ही नवीन संकल्पना नाही, तर तो भारताचा मूळ गाभा आहे. त्रेतायुगातील रामराज्य, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेले धर्मराज्य, कृष्णदेवरायांनी स्थापलेले विजयनगरचे साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ही सर्व सनातन राष्ट्राची रूपे आहेत. लिखित राज्यघटना नव्हती, तेव्हा धर्माचे नियम हीच राज्यघटना होती. सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. त्यामुळे रामराज्याची पहाट कुणीही रोखू शकत नाही. रामराज्याच्या स्थापनेत वानरसेनेने महत्त्वाची भूमिका निभावली, त्याप्रमाणे स्वत:च्या कौशल्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कौशल्यासह तन-मन-धन समर्पित करणे, ही काळानुसार साधना आहे.
हिंदूंनी दबावनीती अंगीकारणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्या जात असतील, हिंदुहिताचे कायदे होण्यास विलंब लागत असेल आणि हिंदूंवरील आघात रोखण्यास शासन-प्रशासन दिरंगाई करत असेल, तर हे रोखण्यासाठी हिंदूंनी दबावनीती अंगीकारणे आवश्यक आहे. ‘अन्य कुणी आपले अश्रू पुसेल’, या भ्रमात हिंदु समाजाने राहू नये. हिंदूंनी केवळ जागृत आणि संघटित होऊन भागणार नाही, तर सर्व प्रकारच्या जिहादचा बीमोड करण्यासाठी सक्षम अन् कृतीशील होणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे
१. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जाज्वल्य विचारांची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
२. शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.
३. लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिंहा (निवृत्त) यांची शौर्यगाथा दाखवणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम ! – लेफ्टनंट कर्नल मनोज सिंहा (निवृत्त)
पितामह भीष्म आयुष्यभर आदर्श जीवन जगले; परंतु कौरवसभेत त्यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे ते कौरवांप्रमाणेच पापाचे भागीदार झाले. याउलट जटायू पक्षी असूनही जीवनाच्या शेवटी त्याने अधर्म करणार्या रावणाचा प्रतिकार केला. त्यामुळे जटायूला श्रीरामाच्या मिठीत मृत्यू आला. आयुष्यात कितीही पुण्यकर्म केले; परंतु अधर्माचा प्रतिकार केला नाही, तर पुण्याचा क्षय होतो. अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत हेच मार्गदर्शन अर्जुनाला केले होते आणि कलियुगातही भगवंताचे हेच मार्गदर्शन हिंदूंसाठी मार्गदर्शक आहे.
↑↑↑ सभा पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा ↑↑↑

माता-भगिनींनो, धर्मासाठी लढणार्यांसाठी प्रार्थना करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
छत्रपती शिवाजी महाराज हे अफझलखानाचा कोथळा काढण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या पत्नी सईबाई आजारी होत्या; परंतु त्यांनी छत्रपती शिवरायांना थांबवले नाही. ‘आधी हिंदवी स्वराज’ हाच सईबाईंचा विचार होता. आजही आपल्याला सईबाई, माता जिजाऊ यांच्या सारख्या माता-भगिनींची आवश्यकता आहे. पतीच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करता, तशी हिंदु धर्मासाठी लढा देणार्यांसाठीही ईश्वराकडे प्रार्थना करा. मनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा विचार धगधगत ठेवा; कारण हिंदु राष्ट्र असेच मिळणार नाही. त्यासाठी बलीदान द्यावे लागेल.

ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक