वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद

स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक २३)

स्त्रियांमध्ये वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन – यूटीआय) ही अत्यंत सामान्य समस्या आहे. विशेषतः महिलांमध्ये मूत्रमार्गाची रचना लहान असल्यामुळे संसर्ग लवकर होण्याची शक्यता अधिक असते. अनेक स्त्रियांना लघवी करतांना जळजळ, वारंवार लघवी लागणे किंवा खालच्या पोटात वेदना अशा तक्रारी जाणवतात. काही वेळा ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवते आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करते. आयुर्वेद या समस्येकडे केवळ संसर्ग म्हणून न पहाता शरिरातील दोष असंतुलन, पचनशक्ती आणि जीवनशैलीच्या दृष्टीने विचार करतो.

लेखांक २२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1058770.html

१. ‘युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ म्हणजे काय ?

मूत्रमार्ग, मूत्राशय किंवा संबंधित भागात जंतूसंसर्ग होणे, म्हणजे ‘युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’. स्त्रियांमध्ये हे संक्रमण अधिक प्रमाणात आढळते. योग्य वेळी उपचार न घेतल्यास संक्रमण वाढून किडनीपर्यंत परिणाम होऊ शकतो.

२. आयुर्वेदात या अवस्थेचा संबंध मुख्यतः पित्तदोष वाढ, मूत्रवह स्रोतस दुष्टी, आम आणि उष्णता वाढ यांच्याशी जोडला जातो.

३. प्रमुख लक्षणे

लघवी करतांना जळजळ, वारंवार लघवी लागणे, लघवी न्यून प्रमाणात होणे, खालच्या पोटात वेदना, लघवीला दुर्गंधी येणे, ताप किंवा अंगदुखी (काही वेळा), थकवा आणि चिडचिड होणे.

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

४. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

अ. पित्तदोष वाढ : शरिरात उष्णता वाढल्याने जळजळ आणि दाह निर्माण होतो.

आ. मूत्रवह स्रोतस दुष्टी : मूत्रमार्गात अवरोध किंवा संसर्ग होतो.

इ. अपुरी पाण्याची मात्रा : शरिरात उष्णता वाढते.

ई. स्वच्छतेचा अभाव : संक्रमणाची शक्यता वाढते.

उ. ताण आणि पचनबिघाड : रोगप्रतिकार शक्ती न्यून होते.

५. आयुर्वेदानुसार चिकित्सेत करायचा विचार

उपचार करतांना वैद्य ‘संसर्ग वारंवार होतो का ?, ताप किंवा इतर गंभीर लक्षणे आहेत का ?, पचनशक्ती (अग्नी), पाण्याचे सेवन, प्रकृती (वात-पित्त-कफ), मधुमेह किंवा इतर आजार आहेत का ?’, या सूत्रांचा विचार करतात.

६. मुख्य उद्देश

पित्तशमन + मूत्रशुद्धी + दाह न्यून करणे + रोगप्रतिकार शक्ती वाढवणे

७. आयुर्वेदानुसार उपचारपद्धत

अ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)

१. गोक्षुर : मूत्रविकारांमध्ये उपयुक्त

२. चंद्रप्रभा वटी : मूत्रमार्ग आरोग्य

३. गुडुची (गिलोय) : रोगप्रतिकार शक्ती वाढवते

४. त्रिफळा : शुद्धी आणि पचन सुधारणा

५. धन्यक (कोथिंबीर) : पित्तशमन

आ. पंचकर्म

१. आवश्यकतेनुसार सौम्य शोधन चिकित्सा

२. पित्त संतुलनासाठी विरेचन

८. घरगुती आयुर्वेदाचे उपाय

अ. भरपूर कोमट पाणी पिणे

आ. नारळपाणी / कोथिंबीर पाणी

इ. लघवी रोखून न ठेवणे

ई. स्वच्छता राखणे

उ. सुती आणि सैल कपडे वापरणे

ऊ. वारंवार प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) स्वतःहून घेणे टाळावे.

९. आहार मार्गदर्शन

अ. काय घ्यावे ? : कोमट पाणी, फळे, भाज्या, तूप, हलका आहार

आ. काय टाळावे ? : अधिक तिखट, आंबट पदार्थ, ‘फास्ट फूड’ (पिझ्झा, बर्गर), अल्प पाणी पिणे, ‘कोल्ड ड्रिंक्स’ (शीतपेये)

१०. जीवनशैली मार्गदर्शन 

स्वच्छता राखणे, पुरेशी झोप, ताण न्यून ठेवणे, लघवी दीर्घकाळ रोखू नये.

११. निष्कर्ष

वारंवार होणारे मूत्रसंक्रमण हे केवळ संक्रमण नसून शरिरातील पित्त असंतुलन आणि जीवनशैलीतील त्रुटींचे संकेत असू शकतात. आयुर्वेद या समस्येवर नैसर्गिक आणि समग्र उपचार सुचवतो. योग्य आहार, स्वच्छता, पाण्याचे योग्य सेवन आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने मूत्रसंक्रमणाची पुनरावृत्ती न्यून करता येऊ शकते.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा