राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !

संपामध्ये सहभागी झाल्याचा परिणाम

पुणे – राज्यात ९ जुलै या दिवशी झालेल्या ‘शाळा बंद आंदोलना’त सहभागी झालेल्या ८ सहस्र ६१९ शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्यात येत असल्याची माहिती ‘उच्च माध्यमिक शिक्षण संचालक’ डॉ. महेश पालकर यांनी दिली.

९ जुलैच्या आंदोलनापूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना कोणतीही शाळा बंद राहू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. शाळा बंद ठेवणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एका दिवसाच्या वेतनाची कपात करण्याची आदेश जारी केले होते.