Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !

  • पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी भारतातील तरुण संपर्कात असल्याच्या संशय

  • ६६ जणांची चौकशी झाल्याची माहिती

पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी

पुणे – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (‘अँटी टेररिस्ट स्कॉड’ने अर्थात् ए.टी.एस्.ने) पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या जाळ्यावर मोठी कारवाई करत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात २३ हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी भट्टीशी संपर्कात असल्याच्या संशयावरून ६६ जणांची शोध घेऊन त्यांची चौकशी केली. या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भ्रमणभाष आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईच्या वेळी काही संशयितांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालू असल्याची माहिती ए.टी.एस्.ने दिली. या मोहिमेच्या अंतर्गत संपूर्ण राज्यातून जवळपास ११२ हून अधिक संशयित लोकांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’च्या सूचनेवरून शहजाद भट्टी आणि त्याचे साथीदार भारतात छुपे ‘नेटवर्क’ (यंत्रणा) चालवत होते. हे संशयित फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करून भारतीय तरुणांच्या संपर्कात येत होते. अनेक बेरोजगार आणि संवेदनशील तरुणांना स्वत:च्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात होता.