Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार

बहरीन, जॉर्डन स्थित अमेरिकेच्या तळांवरील आक्रमणानंतर अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर  

AI निर्मित चित्र

तेहरान (इराण) – संयुक्त अरब अमिरातच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ओमानच्या जलक्षेत्राजवळ त्यांच्या २ तेलवाहू नौकांवर इराणच्या क्षेपणास्त्रांनी मारा केला. ‘मोम्बासा’ आणि ‘अल बाहिया’ अशी नावे असलेल्या या नौकांवर झालेल्या आक्रमणात १ भारतीय ठार झाला, तर ७ जण घायाळ झाले. दुसरीकडे इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा वापर करून बहरीनमधील ‘अल-जुफैर’ सैनिकी तळ आणि अमेरिकेच्या ‘५ व्या ताफ्या’चे मुख्यालय यांच्यावर आक्रमण केल्याचा दावा केला आहे. याव्यतिरिक्त त्यांनी जॉर्डनमधील वायूदलाच्या एका तळावरील अमेरिकी सैन्य आणि महत्त्वाची सैनिकी आस्थापने यांना लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही डागली आहेत.

अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने माहिती दिली की, इराणवर करण्यात आलेल्या आक्रमणात बुशेहर, चाबहार, जास्क, कोनारक, अबू मुसा आणि बंदर अब्बास येथील सैनिकी तळांना लक्ष्य करण्यात आले. सध्या आखातामध्ये अमेरिकेचे ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात आहेत.

संयुक्त अरब अमिरातकडून निषेध !

संयुक्त अरब अमिरातने इराणच्या आक्रमणांचा तीव्र शब्दांत निषेध केला असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन आणि प्रादेशिक सुरक्षेला धोका असल्याचे म्हटले आहे. या वाढत्या कारवायांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो, असे अमिरातने स्पष्ट केले.

भारताकडून इराणी अधिकार्‍यांना समन्स

आक्रमणात भारतीय कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणी राजनैतिक अधिकार्‍यांना समन्स बजावले आहे. भारताने इराणी दूतावासाकडून स्पष्टीकरण मागितले असून या आक्रमणाविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

हॉर्मुझमधून जाणार्‍या नौकांकडून २० टक्के कर वसूल करणार ! – ट्रम्प यांची घोषणा  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हॉर्मुझची सामुद्रधुनी (दोन जलाशयांना जोडणारा जलमार्ग) उघडी राहील आणि तिच्या सुरक्षेचे दायित्व अमेरिकेचे असेल. स्वतःला ‘हॉर्मुझ सामुद्रधुनीचा संरक्षक’ संबोधत ट्रम्प यांनी सांगितले की, या कामाचा खर्च भागवण्यासाठी सामुद्रधुनीतून जाणार्‍या सर्व मालावर २० टक्के कर आकारला जाईल. इराणी नौका आणि त्याचे ग्राहक यांच्यावरील बंदी कायम राहील; परंतु इतर सर्व देशांच्या नौका कोणत्याही अडथळ्याविना हॉर्मुझमधून जाऊ शकतील. या नवीन व्यवस्थेवरील काम तात्काळ प्रारंभ केले जाईल.

हॉर्मुझवरील नियंत्रण सोडणार नाही ! – इराण

ट्रम्प यांच्या घोषणेचा इराणने तीव्र निषेध केला. इराणी सैन्याच्या खातम अल-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप स्वीकारार्ह नाही. या सागरी मार्गाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याचा अधिकार इराणला आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी इराण प्रत्येक पाऊल उचलेल. आम्ही हॉर्मुझवर नियंत्रण कायम ठेवू. अमेरिकेच्या हस्तक्षेपापुढे आणि दबावापुढे झुकणार नाही.

अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ३ टक्के वाढ

अमेरिका-इराण यांच्यामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर १३ जुलैला आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती ३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्या. दुपारच्या सत्रात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल जवळपास ७८ डॉलरवर पोचले.