UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !

हिंदूंकडून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

लंडन – लंडनपासून १२० किमी दूर पीटरबरो येथील ४० वर्षांपूर्वीचे मंदिर आणि ‘कम्युनिटी सेंटर’ असलेल्या ‘न्यू इंग्लंड कॉम्प्लेक्स’ या जागेच्या विक्रीवरून वाद निर्माण झाला आहे. ‘पीटरबरो सिटी कौन्सिल’ या संस्थेने लिलावानंतर ही जागा ‘युनायटेड किंगडम इस्लामिक मिशन’ या संस्थेला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

याच परिसरात ‘भारत हिंदु समाजा’चे मंदिर आहे. ते शहर आणि आजूबाजूच्या सहस्रो हिंदूंचे प्रमुख पूजास्थान आहे. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या ‘भारत हिंदु समाजा’ने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करून विक्रीच्या प्रक्रियेला आव्हान दिले. ‘भारत हिंदु समाज’ संघटनेचा आरोप आहे की, ‘पीटरबरो सिटी कौन्सिल’ने मंदिराच्या ४० वर्षांच्या धार्मिक आणि सामुदायिक भूमिकेकडे दुर्लक्ष केले. लिलावाच्या मूल्यांकनातही गंभीर त्रुटी होत्या. फेब्रुवारी २०२६ मध्ये उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देत ‘पीटरबरो सिटी कौन्सिल’ला या जागेची विक्री करण्यापासून रोखले होते.

विक्रीची प्रक्रिया कायद्यानुसार झाली कि नाही ?, हे पडताळणार !

आता न्यायिक पुनरावलोकनात ‘निर्णय घेण्याची प्रक्रिया कायद्यानुसार होती कि नाही ?’, हे पडताळले जात आहे. मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, त्यांचा विरोध ‘युनायटेड किंगडम इस्लामिक मिशन’ संस्थेला नाही, तर ‘पीटरबरो सिटी कौन्सिल’चा निर्णय आणि त्याने पार पाडलेली प्रक्रिया यांना आहे.

वाढते आर्थिक संकट आणि सरकारी साहाय्यातील कपातीमुळे ब्रिटनमधील अनेक स्थानिक ‘कौन्सिल’ आता त्यांच्या सामाजिक इमारती, क्रीडा केंद्रे आदी विकून आर्थिक तूट भरून काढत आहेत.

मंदिर बंद झाल्यास हिंदूंना ६४ कि.मी. दूर जावे लागणार !

भारत हिंदु समाजाच्या मते, हे मंदिर परिसरातील ४ सहस्र ५०० हिंदूंसाठी प्रमुख धार्मिक ठिकाण आहे. ते बंद झाल्यास भाविकांना पूजा करण्यासाठी केंब्रिज (५६ कि.मी.) किंवा लेस्टर (६४ कि.मी.) येथे जावे लागेल.

संपादकीय भूमिका

मुसलमानबहुल देश असो किंवा ख्रिस्तीबहुल देश तेथील अल्पसंख्य हिंदूंवर नेहमीच अन्याय होतो; पण हिंदूंच्या मतांवर निवडून येणारे भारतातील कुठलेही सरकार कधी त्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलत नाही. १०० कोटी हिंदूंना हे लज्जास्पद !