सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्‍यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्‍यांचा मृत्यू !

४ वारकरी महिला घायाळ

पुणे – आषाढी वारीच्या वेळी सासवड-जेजुरी मार्गावर १३ जूनला सकाळी भीषण अपघात झाला. सासवडहून जेजुरीकडे ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत वारकरी पायी प्रवास करत होते. त्या वेळी भोंगळे मळा परिसरात वारकर्‍यांचे सामान वाहून नेणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि दिंडीत घुसला. या भीषण अपघातात राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या ३ महिला वारकर्‍यांचा मृत्यू झाला असून ४ महिला घायाळ झाल्या आहेत. तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलीस, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोचल्या. घायाळांना त्वरित वैद्यकीय साहाय्य देण्यात आले असून अपघाताची चौकशी चालू करण्यात आली आहे. अपघातग्रस्त ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील असून तो वारीसाठी लागणारा शिधा आणि साहित्य घेऊन जात होता. ट्रकचालकाचे वय अनुमाने ७० वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

चालकाला ग्लानी आल्याचा प्राथमिक दावा !

ट्रक चालकाने तापाच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला ग्लानी आली. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट पुढे चालणार्‍या वारकर्‍यांवर जाऊन आदळला, असा प्राथमिक दावा करण्यात आला आहे; मात्र अपघाताचे नेमके कारण काय होते ? याचे अन्वेषण पोलीस आणि संबंधित यंत्रणा करीत आहेत.

वारकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी ! – रोहित पवार, आमदार, शरदचंद्र पवार गट

वारकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. अपघाताची सखोल चौकशी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि वारकर्‍यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, असे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.