ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश

टपाल फाटल्याचे आणि त्यातील साहित्य गहाळ झाल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

फिरोजपूर (पंजाब) – टपाल फाटल्याच्या आणि त्यातील साहित्य गहाळ झाल्याच्या प्रकरणी ‘फिरोजपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगा’ने टपाल विभागाला संबंधित ग्राहकाला हानीभरपाई म्हणून ४० सहस्र रुपये देण्याचा आदेश दिला. यामध्ये गहाळ कपड्यांची किंमत ३५ सहस्र ३६० रुपये आणि न्यायालयीन खर्चापोटी ५ सहस्र रुपये यांचा समावेश आहे.

‘फिरोजपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगा’ने म्हटले की, टपालाची हानी  होणे, ही सेवेतील मोठी त्रुटी आहे. यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास झाला आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास आणि न्यायालयीन खर्चासाठी योग्य हानीभरपाई देण्यास टपाल विभाग उत्तरदायी आहे.

काय घडले ?

तक्रारदाराने सांगितले की, त्यांच्या मुलाने फिरोजपूर कॅन्टोन्मेंटच्या मुख्य टपाल कार्यालयामधून बिदर येथील टपाल कार्यालयामध्ये एक पार्सल पाठवले होते. पाठवतांना या पार्सलचे वजन १७.२ किलो होते आणि त्यात ३५ सहस्र ३६० रुपये किमतीचे कपडे होते; मात्र हे पार्सल बिदर टपाल कार्यालयामध्ये फुटलेल्या अवस्थेत पोचले आणि त्याचे वजन केवळ ८.३९ किलो भरले. त्यामुळे संबंधित व्यक्तीने ते स्वीकारण्यास नकार दिला. तक्रारदाराने गहाळ झालेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी आणि हानीभरपाईसाठी टपाल विभागाकडे वारंवार हेलपाटे मारले, तरीही कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही, असा आरोप केला. तक्रारदाराने कपड्यांची किंमत परत मिळण्यासह मानसिक त्रासापोटी १ लाख आणि न्यायालयीन खर्चाची मागणी केली होती.