गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्‍यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

विठ्ठल भक्त वारकरी ३५० कि.मी. अंतर १४ दिवसांत करणार पूर्ण !

मेणकुरे गोवा येथून निघालेली श्री विठ्ठल भक्तांची वारी

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – ‘विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, हरि ओम विठ्ठल’ असा गजर करत गोव्यातील विविध भागांतून सुमारे ५ सहस्र वारकर्‍यांनी विविध दिंडी पथकांच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी (२५ जुलैच्या पूर्वी) हे वारकरी सुमारे ३५० कि.मी. अंतर सुमारे १४ दिवस पायी चालून पंढरपूर (महाराष्ट्र) येथील श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला पोचणार आहेत. जाणकारांच्या मते गोव्यात सुमारे २० वर्षांपूर्वी पंढरपूर येथे वारीला जाण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला आणि यंदा ४० हून अधिक दिंडी पथके वारीमध्ये सहभागी झाली आहेत.

कशी असतात वारी पथके ?

मुळगाव, डिचोली येथील वारीला नवसंजीवनी देणारे उदय बुवा फडके वारी पथकाविषयी माध्यमाकडे माहिती देतांना म्हणाले, ‘‘आम्ही वर्ष २००८ मध्ये ५३ पुरुष भाविकांनी पंढरपूर येथे वारीला जाण्यास प्रारंभ केला आणि आज एका पथकातील संख्या १२५ आहे. वारीला जातांना सुरक्षेच्या कारणास्तव पथकातील सदस्यांची संख्या आम्ही मर्यादित ठेवली आहे. पथकासोबत जेवण बनवणारा एक गट असतो आणि पथकाच्या मागे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी २ चारचाकी वाहने (सोबत प्रथमोपचार पेटी असते) असतात. पथक रात्री ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी पथकातील सदस्यांचे सामान ठेवणे आणि पुन्हा सामान घेणे याचे दायित्व २ सदस्यांना दिलेले असते. प्रतिदिन आम्ही न्यूनतम ३० कि.मी.चा पायी प्रवास करत असतो. पथकामध्ये ६० वर्षांहून अधिक वयोगटातील अनेक सदस्य आहेत. दिंडीमध्ये एका वाहनामध्ये श्री विठ्ठल-रखुमाई देवतेची प्रतिमा ठेवलेली असते. या वाहनाच्या पुढे काहीजण डोक्यावर तुळशी वृंदावन, तर काही जण हातात वीणा घेऊन चालत असतात. वारीचे आयोजन करणे सोपे नसते; मात्र श्री विठ्ठलच सर्व काही करत असतो आणि वाटेतील अडचणी तोच सोडवत असतो.’’