JeM Commandor Masood Ilyas Kashmiri : मसूद अझहर यानेच रचला होता संसद आणि मुंबई यांवरील आक्रमणाचा कट  

जैश-ए-महंमदचा आतंकवादी कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने आणखी एक स्वीकृती !

मसूद इलियास काश्मिरी व मसूद अझहर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जैश-ए-महंमदचा आतंकवादी कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने आणखी एक स्वीकृती दिली आहे. त्याने वर्ष २००१ मध्ये देहलीतील भारतीय संसद आणि वर्ष २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणांमागे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर असल्याचे सांगितले. या वेळी त्याने पाकिस्तानातील बालाकोट आणि बहावलपूर येथील जैशच्या तळांचा उल्लेख केला. त्याने सांगितले की, बालाकोटच्या भूमीवरून मसूद अझहरच्या कारवाया चालत होत्या.

आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकचे सैन्याधिकारी

आतंकवादी काश्मिरी याने अशीही माहिती दिली की, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी बहावलपूर येथील जैशच्या छावणीत मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याचा आदेश थेट पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी त्यांच्या वरिष्ठ सैन्याधिकार्‍यांना दिला होता. एवढेच नाही, तर सरकार आणि प्रसारमाध्यमे यांच्यात समन्वय करणार्‍या ‘इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन’च्या (आय.एस्.पी.आर्.च्या) महासंचालकाने बहावलपूर आणि जैश-ए-महंमद यांच्यातील संबंध दडपण्याचा प्रयत्न केला होता.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या मोहिमेनंतर आतंकवादी संघटनांमध्ये प्रचंड भीती !

काश्मिरी याच्या स्वीकृतीनंतर आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मोहिमेनंतर आतंकवादी संघटनांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. काश्मिरी याने मंचावरून ‘मिशन-ए-मुस्तफा’साठी (महंमद पैगंबर यांच्या नावाने चालवली जाणारी तथाकथित धार्मिक मोहीम) विविध आतंकवादी गटांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याने सांगितले की, काही जणांनी जिहाद नाकारला आहे; मात्र मी उरलेल्यांसमवेत मिळून पुन्हा जिहाद जिवंत ठेवू इच्छितो.

अमेरिका, भारत आणि इस्रायल येथील युद्धांचे कारण मसूद अझहर

काश्मिरी याने पुढे असेही म्हटले की, आज जगात अमेरिका, भारत आणि इस्रायल येथील युद्धांचे कारण कुणी ठरत असेल, तर तो मसूद अझर आहे. ‘अल्-जिहाद’चा आवाज नेतान्याहूपर्यंत पोचला पाहिजे. या वेळी काश्मिरी याने लोकांना जिहाद जिवंत ठेवण्यासाठी हात वर करून घोषणा करण्याचेही आवाहन केले.

संपादकीय भूमिका

पाकचा आतंकवादी उघडपणे हे मान्य करत आहे, यावरून आता जागतिक समुदायांनी पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्याच्यावर सर्वच पातळ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे ! यासाठी आता भारताने मागणी केली पाहिजे !