साधारण वर्ष २००३-२००४ पासून महाराष्ट्रात ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते’, असा विचार जोर धरू लागला. ‘केवळ गणेशोत्सवातच नव्हे, तर दिवाळी, होळी, रंगपंचमी, नवरात्रोत्सव आदी हिंदूंच्या सणांमुळेही प्रदूषण होते, पर्यावरणाची अत्यंत हानी होते’, हा विचार समाजात बळकट करण्यात आला आणि त्यातून ‘पर्यावरणपूरक उत्सव’ साजरे करण्याची संकल्पना महाराष्ट्रात दृढ करण्यात आली. ‘सण-उत्सव पर्यावरणपूरकच असायला हवेत’, याविषयी कुणाचेच मतभेद असल्याचे कारण नाही; मात्र ‘हिंदूंचे सण प्रदूषणकारी असतात’, हे समाजात बिंबवून हिंदु धर्माची अपकीर्ती करणे, हा या मागील कुटील डाव होता. सण-उत्सव हे उपासनेचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे हिंदूंना आध्यात्मिक ऊर्जा तर प्राप्त होतेच; परंतु त्यामुळे हिंदूंची धर्माशी असलेली नाळ अतूट रहाते. सणांमुळे आपापसांतील वाद बाजूला ठेवून हिंदू समाज एकत्र येतो आणि गुण्यागोविंदाने रहातो. आतापर्यंत अंधश्रद्धा असल्याचा प्रचार करणारे, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक किंवा त्यांची विटंबना करणारे यांच्या हे लक्षात आले की, असे करूनही हिंदू समाज अध्यात्म-धर्म यांपासून दुरावत नाही. सण आणि उत्सव यांच्यापासून हिंदूंना विभक्त केल्यास त्यांच्या श्रद्धा या आपोआप कमकुवत होतील, हे नास्तिकतावादी अन् कथित पुरोगामी यांच्या लक्षात आले. अन्यथा एका ठराविक कालावधीतच आणि तेही अन्य धर्मियांविषयी चकार शब्दही न काढता कथित पुरोगाम्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, रंगपंचमी, होळी, दिवाळी,
नवरात्र अशी संकल्पना निर्माण केली आणि नकळतपणे सण-उत्सव प्रदूषणकारी आहेत, हे हिंदू समाजाच्या मनावर बिंबवले. हे षड्यंत्र नेमके कसे आहे, ते या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया !

१. अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे उपद्व्याप !
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखा व्यक्ती ज्यांचे संपूर्ण आयुष्य नास्तिकतावादाच्या प्रसारात गेले. ‘भोंदूगिरी’, ‘बुवाबाजी’ यांना तर विरोध करायलाच हवा. हिंदु समाजच नव्हे, तर कोणताही सश्रद्ध समाज याच्या विरोधातच आहे; परंतु दाभोलकर यांचा नास्तिकतावाद इतका टोकाचा होता की, ‘श्रद्धा’ नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. ‘श्रद्धा’ ही मुळात ‘अंधश्रद्धा’च असते’, असा प्रचार करणारी ही व्यक्ती. हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून लक्षात येईल. अध्यात्माला अंधश्रद्धा ठरवण्यासाठी या माणसाने ज्ञानाचे मूर्तीमंत उदाहरण असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यावरही टीका केली. (असे हे अंनिसवाले सध्या ‘एकतरी वारी अनुभवावी’ म्हणून पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात.) नास्तिकतावादी यापूर्वीही नव्हे असे नाही; परंतु ते अन्यांच्या श्रद्धांवर घाला घालत नव्हते. ठीक आहे, नास्तिक असावे कि सश्रद्ध ? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे; परंतु डॉ. दाभोलकर यांचा नास्तिकतावाद केवळ हिंदु धर्मालाच लक्ष्य करणारा होता. यावरून या माणसाचा ढोंगीपणा लक्षात येतो. ‘मेलेल्या व्यक्तीची अवहेलना करू नये’, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे; परंतु हे दाभोलकरांनी अवहेलना म्हणून नाही, तर हिंदूंना धर्मापासून तोडण्यासाठी त्यांनी काय काय उपद्व्याप केले, हे समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.
२. डॉ. दाभोलकर यांचा सहभाग हाच षड्यंत्राचा प्रारंभ !

लेखाचा विषय प्रदूषणाविषयीचा असतांना डॉ. दाभोलकर यांविषयी लिहिण्याचे कारण काय ? असे कुणाला वाटेल; परंतु हे षड्यंत्र समजून घेण्यासाठी डॉ. दाभोलकर यांचे व्यक्तीमत्त्व आधी समजून घेतल्यास याची उकल सोपी होईल. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात काम करणारा हा माणूस अचानक प्रदूषण रोखण्यासाठी कसा काम करू लागला. बरे प्रदूषणाच्या विरोधात काम करायचे आहे, तर महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सर्वाधिक जलप्रदूषण नद्यांमध्ये वर्षभर कारखान्यांतून सोडणार्या रसायने, घरातील सांडपाणी, मल:निस्सारण आणि पशूवधगृहातील रक्तमिश्रित पाणी यांमुळे होते अन् हे प्रदूषण वर्षभर होते. हे प्रदूषण रोखावे, यासाठी सरकारला एखादे निवेदन देणे, ही पुष्कळ दूरची गोष्ट ! या माणसाने हे प्रदूषण रोखण्याचे कधी आवाहनही केले नाही. याच दाभोलकरांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होते’, असा प्रचार मात्र केला आणि महत्त्वाचे म्हणजे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मुळे जलप्रदूषण होते’, हे सिद्ध करणारे एकही संशोधन अद्याप पुढे आलेले नाही. असा कोणताही आधार नसतांना डॉ. दाभोलकर यांनी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारशी संधान साधले आणि महाराष्ट्रात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ प्रदूषणकारी असल्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत कार्यालयानेही याविषयी खात्री न करताच प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत असल्याचा प्रचार केला. ‘गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते’, या प्रचारानंतर अंनिसवाले ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, ‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दूध वहाण्याऐवजी गरिबांना द्या’, अशा नसत्या उचापती करू लागले. यांना खरोखरच गरिबांच्या पोटाची चिंता असती, तर वर्षातून एकदा येणारी होळी किंवा महाशिवरात्री यांऐवजी वर्षभरात हॉटेल्स, समारंभ, लग्नासोहळे यांमध्ये वाया जाणारे अन्न गरिबांना मिळावे, यासाठी प्रयत्न केले असते. असे यांनी कधीच केले नाही. या सर्व गोष्टींतून अंनिसला पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण यांच्याशी काहीच देणे-घेणे नाही. हिंदु धर्माची निंदानालस्ती हाच त्यांचा अजेंडा होता. ‘डॉ. दाभोलकर यांचे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन हेच मुळात षड्यंत्र होते’, हे यातून स्पष्ट होते.
३. काँग्रेसकडून हिंदूंच्या विरोधात शासकीय यंत्रणांचा वापर !
वर्ष २००३ मध्ये अंत्यविधीमुळे जलप्रदूषण होत असल्याविषयी मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने काँग्रेस सरकारकडे प्रतिज्ञापत्र मागितले. या प्रतिज्ञापत्रामध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गणेशोत्सवामुळे प्रदूषण होत असल्याचे सूत्र दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ज्या प्रकारे काँग्रेस आघाडी सरकारशी अनुसंधान साधून राज्यात ‘शैक्षणिक जाणिवा प्रकल्प’ आदी उपक्रम राबवले, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा घाट घातला, हे पहाता गणेशोत्सवाद्वारे प्रदूषण होत असल्याविषयीचे प्रतिज्ञापत्र देणे, हा अंनिसचाच ‘अजेंडा’ (कार्यसूची) असल्याची दाट शक्यता आहे; कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना मांडल्यावर ती राज्यात रूजवण्याचे काम काँग्रेस आघाडी सरकार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी केली. एवढेच करून न थांबता ‘कागदी लगद्याच्या गणेशोत्सवा’ला चालना दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तर कागदी गणेशमूर्तींची प्रदर्शनेही त्या वेळी आयोजित केली होती. आता कागदी लगदा, त्यावरील रासायनिक शाई हेच अधिक प्रदूषणकारी असल्याचे पुढे आले आहे, तसेच कागदी लगद्याच्या मूर्तीवर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने बंदीही घातली आहे. यावरून या मंडळाने किती बोगस काम केले असेल, याची कल्पना येते.
४. ‘पर्यावरणपूरक’ नावाआडून श्रद्धेवर घाला !
यापुढे जाऊन राज्यात भाज्यांच्या गणेशमूर्ती, टाकाऊ वस्तूंपासून गणेशमूर्ती, ट्री गणेश आदी धर्मशास्त्र विसंगत संकल्पना पुढे आणल्या गेल्या. याच्या मुळाशी गेलो, तर यामागे अंनिस, काँग्रेस यांसारख्या तथाकिथत पुरोगामी आणि हिंदुविरोधी शक्ती यांचा हात असल्याचे दिसून येईल. प्रदूषणाचा बागूलबुवा निर्माण करून त्यांनी नियोजनबद्धपणे हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. ‘पर्यावरणपूरक’ नावाखाली धर्मशिक्षणाचा अभाव असलेला हिंदु समाज यामुळे संभ्रमित झाला आणि या षड्यंत्रामध्ये फसला. आता मात्र पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडले असून हिंदूंमध्ये या षड्यंत्राविषयी जागृती होत आहे. अंनिससारख्या संस्थांनी जलप्रदूषणांच्या अन्य गंभीर गोष्टींच्या विरोधात कधीच आवाज उठवला नाही. याउलट होळी, नवरात्री, दिवाळी यांमुळे प्रदूषण होत असल्याचा गवगवा या कथित पुरोगामी लोकांनी केला. लग्न समारंभ, क्रिकेटचे सामने, निवडणुकीत विजय या वेळी वर्षभर फटाके लावले जातात, त्याविषयी ही मंडळी मात्र मूग गिळून गप्प रहातात.
५. शासकीय यंत्रणेचा हिंदुविरोधी वापर कसा होत आहे ? हे समजून घ्या !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईतील १ सहस्र ६०८ भोंगे हटवण्यात आल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे यांतील ७२.६९ टक्के, म्हणजे तब्बल १ सहस्र १४९ भोंगे मशिदीवर होते, असे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र ही माहिती वार्षिक अहवालात कधीच नमूद केली नाही; परंतु हेच प्रदूषण नियंत्रण मंडळ गणेशोत्सव, दिवाळी या वेळी फटाक्यांमुळे किती प्रदूषण होते, याची आकडेवारी प्रतिवर्षीच्या वार्षिक अहवालामध्ये न चुकता देते. गणेशोत्सवामध्ये प्रदूषण हाेत असल्याचा गवगवा करणारे हे मंडळ ईदच्या दिवशी कापण्यात येणार्या बकर्यांविषयी कधीच काही सांगत वा बोलत नाही. मुंबईमध्ये नागरिकांकडून आलेल्या शेकडो तक्रारींनंतर ईदला सार्वजनिक स्थळी प्राण्यांची हत्या करण्यास मुंबई महानगरपालिकेने ३-४ वर्षांपासून बंदी घातली आहे. काँग्रेसच्या काळापासून या शासकीय यंत्रणांना हिंदुविरोधी काम करण्याची सवय लागली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही ही सवय सुटलेली नाही.
काँग्रेस आघाडीचे हिंदुद्रोही स्वरूप उघड !

काँग्रेस आघाडी सरकारने गणेशोत्सवात प्रदूषण होत असल्याचा निर्माण केलेला बागूलबुवा अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या संशोधनातून उघड झाला. ‘पीओपी’ मूर्तीमुळे प्रदूषण होते का ?’, याविषयी संशोधन करण्यासाठी महायुती सरकारने मार्च २०२५ मध्ये डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने संशोधन करून जून २०२५ मध्ये जेव्हा अहवाल सादर केला, तेव्हा त्यातून ‘पीओपी’च्या मूर्तीमुळे प्रदूषण होत नसल्याचे समोर आले. ही माहिती २४ जुलै २०२५ या दिवशी महायुती सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. त्या वेळी न्यायालयाने ‘पीओपी’ मूर्तींवरील बंदी उठवली. यावरून अंनिससारख्या हिंदुद्रोही संघटनांच्या नादी लागून काँग्रेस आघाडीने हिंदुविरोधी कारवाया केल्या, त्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. ‘पीओपी’ प्रदूषणकारी नसून प्रश्न त्याच्या विघटनाचा आहे. हे विघटन कसे करावे ? याचा अभ्यास करण्यासाठी राज्यशासनाने नुकतीच एक तज्ञांची समिती स्थापन केली आहे.
– श्री. प्रीतम नाचणकर
६. काँग्रेसप्रमाणे नव्हे, महायुतीने धर्मशास्त्राचा आधार घ्यावा !
काँग्रेसने राबवलेले हिंदुविरोधी षड्यंत्र महायुती सरकारने उघड केले, ही एक चांगली गोष्ट झाली. सांस्कृतिक मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवामधून राष्ट्रप्रेम जागृत करणारे उपक्रमही राबवले जात आहेत, हीसुद्धा एक सकारात्मक गोष्ट आहे; परंतु गणेशोत्सवातील मोठ्या श्री गणेशमूर्ती पुढील वर्षासाठी ठेवण्याचे महायुती सरकारचे आवाहन हे धर्मशास्त्राशी विसंगत आहे. श्री गणेशमूर्ती ही काही दिखाऊ वस्तू नाही. अवाढव्य श्री गणेशमूर्ती पुढील वर्षापर्यंत ठेवतांना त्यांचे पावित्र्य राखले जाईल का ? ती भंग पावण्याचाही संभव आहे. मौजमजेकडे जात असलेल्या गणेशोत्सवातील धार्मिकता टिकून रहावी, यासाठी सरकारने छोट्या गणेशमूर्ती आणण्याचे आवाहन करणे, ‘डिजे’च्या (मोठ्या कर्णकर्कश आवाजातील ध्वनीक्षेपक) बंदीची कार्यवाही करणे, गणेशमूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जित करण्याला अनुमती देणे यांवर भर देणे आवश्यक आहे.
भाविकांना पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यापेक्षा प्रदूषण रोखण्यास सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे, याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. गणेशोत्सव, दिवाळी, होळी आदी हिंदूंचे सण-उत्सव हे पर्यावरणपूरकच आहेत. उत्सवामध्ये रासायनिक रंग वापरणे, थर्माकॉलचा वापर, ‘डिजे’ लावणे आदी प्रदूषणाला कारण ठरणार्या गोष्टी जर सरकारने रोखल्यास किंवा ते वापरणार्यांवर कडक कारवाई केल्यास प्रदूषण रोखले जाईल. हिंदूंचे सण-उत्सव हे पर्यावरणाशी निगडित,
म्हणजे पर्यावरणाला पूरकच आहेत. त्यामुळे ते पर्यावरणपूरक साजरे करण्याचे आवाहन करण्याची आवश्यकताच नाही. ते भक्तीभावाने साजरे करून त्यांचा आध्यात्मिक लाभ घेण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे.
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (२६.८.२०२५)
संपादकीय भूमिकाहिंदूंचे सण प्रदूषणकारी असल्याचे सांगून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा नास्तिकतावादी अन् कथित पुरोगामी यांचा डाव हाणून पाडा ! |
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !