कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

पुणे येथे ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’ला दिमाखात प्रारंभ !

शेखर मुंदडा, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवर

पुणे – गोवंश हत्याबंदीचा कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची प्रभावी कार्यवाही करण्यासाठी झगडावे लागते, अशी खंत राज्यसभेतील भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ‘गोवंश संवर्धन हे शेतकरी आणि गोपालक यांवर बोजा ठरू नये, तर गोमयाधारित उत्पादनांच्या प्रभावी विपणन व्यवस्थेतून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशी गोवंशाचे रक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग अन् पशूसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ २२ जूनपासून राज्यभर चालू झाली.

पुण्यात झालेल्या उद्‍घाटन कार्यक्रमात गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. वल्लभभाई कथिरिया, भाजपचे माजी उपाध्यक्ष शाम जाजू आणि आयोगाचे सचिव शामकांत पाटील उपस्थित होते.

वल्लभभाई कथिरिया म्हणाले की, या संवाद यात्रेमुळे गोवंश संवर्धनाविषयी व्यापक जनजागृती होईल आणि गोशाळांच्या बळकटीकरणाला चालना मिळेल. मुंदडा यांनी सांगितले की, ही यात्रा सलग १५ दिवस चालू रहाणार असून यात्रेचा समारोप ५ जुलैला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.