क्रिकेटचा उदो उदो नको !

सध्या फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा चालू असून अनेक देश त्यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे आशिया खंडातील ‘इराक-इराण’सारखे देशही या खेळात सहभागी होत असतांना भारत या खेळात नाही. याचे कारण असे की, विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या दृष्टीने भारताला आशियाई पात्रता फेरीत अव्वल संघांना मागे टाकावे लागते. त्यात सातत्यपूर्ण कामगिरी न झाल्यामुळे भारतीय संघ बाहेर पडला. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांमध्ये राष्ट्र्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय खेळांत यश मिळवलेल्या खेळाडूंची विविध चलचित्रे प्रसारित होत आहेत; मात्र विविध खेळांत नावलौकिक कमवणार्‍या खेळाडूंना क्रिकेटमधील खेळाडूंसारख्या सुविधा का नाहीत ? असा थेट प्रश्न माध्यमांतून विचारला जात आहे. नुकतेच देव मीना आणि कुलदीप कुमार यांनी ‘पोल वौल्ट’ (बांबूची उडी) या खेळात राष्ट्रीय विक्रम नोंदवला. तेव्हा खेळाचे साहित्य रिक्शातून नेतांनाचे त्यांचे चलचित्र प्रचंड प्रमाणात प्रसारित झाले. ‘भारतात क्रिकेट वगळता अन्य खेळांना दुय्यम दर्जा का दिला जातो ?’, असा कटू; पण सत्य प्रश्न पुन्हा समोर आला.

खेळाडूंना घडवण्यासाठी आवश्यक मूलभूत व्यवस्था उपलब्ध होत नाही; कारण त्यासाठी असलेली त्रोटक राजकीय इच्छाशक्ती आणि कमालीची उदासीनता ! ‘कॉमन वेल्थ घोटाळा’ हे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण होय. इतकेच नव्हे, तर देशातील लोकसंख्येचा पुष्कळ मोठा भाग क्रिकेटला अतीमहत्त्व देतो. त्यामुळे ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्र्रीय विक्रम करण्यात भारत पुढे आहे, त्याप्रमाणे अन्य खेळांत तो नाही. हे चित्र पालटायला हवे. क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास तेही आंतरराष्ट्र्रीय पातळीवर चांगले प्रयत्न करू शकतील. विविध खेळांमध्ये देशाला जागतिक स्तरावर यश संपादन करून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी. त्यासह नागरिकांचेही तितकेच दायित्व आहे. त्यांनीही ‘क्रिकेट’ या प्रस्थापित खेळाला अतीमहत्त्व देणे टाळायला हवे. सामान्य नागरिकाला ‘इंडियन प्रीमियर लीग’सारखे सामने पाहून किती लाभ होतो, हे सर्वश्रुत आहे. क्रिकेटमधून मिळणारा महसूल आणि आर्थिक निधी अन्य खेळांसाठी अधिकाधिक का वापरला जाऊ नये ? प्रशासनाकडून अगदी शालेय स्तरातूनच विविध खेळांसाठी प्रयत्न झाल्यास आणखी चांगले आणि दर्जेदार खेळाडू निर्माण होतील, यात शंका नाही. थोडक्यात काय, तर क्रिकेटचा उदो उदो करणे थांबल्यास अन्य खेळांची वानवा होणार नाही. यासाठी आपण एक नागरिक म्हणून सतत जागृती करत रहायला हवी !

– श्री. केतन पाटील, पुणे