नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !


कोल्हापूर –
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या नांदणी येथील ‘महादेवी’ म्हणजेच ‘माधुरी’ हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्षभरापूर्वी गुजरातमधील ‘वनतारा’ येथे गेलेल्या माधुरीने उपचार, पुनर्वसन आणि विशेष देखभालीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ती पूर्वीपेक्षा अधिक निरोगी, सक्षम अन् आत्मविश्वासपूर्ण झाल्याने कोल्हापुरातील तिच्या घरी परतण्यास सज्ज झाली आहे.

याविषयी ‘वनतारा’ने निवेदन प्रसिद्ध केले आहे. एक वर्षापूर्वी माधुरी वनतारा येथे आली होती. तेव्हापासून तिला विशेष काळजी, आरामदायी वातावरण आणि आवश्यक आधार देण्यात आला. पशुवैद्यकीय तज्ञ, देखभाल कर्मचारी, आहारतज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांच्या समर्पित पथकाने तिच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर आवश्यक लक्ष, कौशल्य आणि प्रेम दिले. योग्य आहार, नियमित वैद्यकीय चाचण्या आणि तज्ञांच्या देखरेखीमुळे तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.