मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !

‘मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी हे घटक त्याची कार्य करण्याची विविध माध्यमे आहेत. प्रत्येक घटकाचे स्वरूप निराळे असून त्यांवरील प्रारब्धाचा प्रभाव निरनिराळ्या प्रमाणांत असतो. प्रस्तुत लेखात या घटकांवर प्रारब्धाचा असलेला प्रभाव आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध यांचे विवेचन केले आहे.                                

(पूर्वार्ध)

शरीर, चित्त, मन आणि बुद्धी ही आत्म्याची सगुणात व्यक्त होण्याची माध्यमे आहेत.

१. प्रारब्ध म्हणजे काय ?

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’, असे ‘गीत रामायणा’त म्हटले आहे. मनुष्य पराधीन आहे; कारण तो प्रारब्धाच्या अंकित आहे. प्रारब्ध म्हणजे पूर्वकर्मांमुळे वर्तमान जीवनात असलेले परिस्थितीच्या रूपातील बंधन होय. हे बंधन जिवावर असलेल्या मायेच्या प्रभावामुळे उद्भवते. हा मायेचा प्रभाव जिवात असलेल्या अहंमुळे, म्हणजे स्वतःला ईश्वरापासून वेगळे समजण्यामुळे निर्माण होतो. थोडक्यात अहं जितका अधिक, तितका मायेचा प्रभाव अधिक आणि तितके प्रारब्धाचे बंधनही अधिक !

२. मनुष्याच्या अस्तित्वाच्या विविध घटकांवर प्रारब्धाचा असलेला प्रभाव आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध

मनुष्याचे अस्तित्व हे शरीर, अंतःकरण (चित्त, मन, बुद्धी आणि अहं) अन् आत्मा यांनी मिळून बनले आहे. यांपैकी आत्मा हा चैतन्यमय असून अन्य घटक हे आत्म्याची सगुणात व्यक्त होण्याची माध्यमे आहेत. या घटकांवर प्रारब्धाचा प्रभाव निरनिराळ्या प्रमाणात असतो. या घटकांचा ग्रहांशीही संबंध आहे; कारण ग्रह हे व्यक्तीचे प्रारब्ध दर्शवतात. प्रत्येक घटकाचे कार्य, त्याच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव आणि त्याचा ग्रहांशी असलेला संबंध, यांचे विवेचन पुढे दिले आहे.

२ अ. शरीर

शरीर हे कर्म करण्याचे साधन आहे. बुद्धीद्वारे विचार करता येतो; पण कृती केवळ शरिराद्वारे करता येते. जिवाच्या अस्तित्वामध्ये शरीर हा सर्वांत स्थूल घटक आहे. त्यामुळे शरिरावर प्रारब्धाचा प्रभाव सर्वाधिक असतो. आपल्याला लाभलेले शरीर, त्याची उंची, रंग, आकार, ठेवण, हृदयादी अंतर्गत अवयव, रक्तादी धातू, श्वसनादी संस्था, वातादी प्रकृती, आयुष्यमान इत्यादींवर आपले नियंत्रण नसते. हे सर्व अनुवंशिकता आणि प्रारब्ध यांनुसार मिळते. व्यक्तीला तीव्र प्रारब्ध बहुधा शरिराद्वारे भोगावे लागते, उदा. शारीरिक विकलांगता, शारीरिक विकार, अनारोग्य, अपघात, अपमृत्यू इत्यादी. हे प्रारब्ध टाळता येण्यासारखे नसते.

२ अ १. शरीर आणि ग्रह यांचा संबंध : प्रत्येक ग्रहाचा शरिरातील विशिष्ट भागाशी संबंध असतो. कुंडलीत जो ग्रह दूषित (टीप) असेल, त्या ग्रहाशी संबंधित व्याधी व्यक्तीला होण्याची शक्यता असते.

टीप : कुंडलीत ग्रह दूषित असणे, म्हणजे अशुभ स्थितीत असणे, उदा. ग्रह प्रतिकूल स्थानात असणे, प्रतिकूल राशीत असणे, शत्रूग्रहाच्या कुयोगात असणे इत्यादी.

२ आ. चित्त (अंतर्मन)

चित्तामध्ये (अंतर्मनामध्ये) जन्मोजन्मीचे अनुभव, इच्छा, भावना, विचार, कर्म आदींचे संस्कार असतात. स्वतःचा ‘स्वभाव, प्रवृत्ती, दृष्टीकोन, तसेच गुण आणि दोष’ – थोडक्यात स्वतःचे ‘व्यक्तीमत्त्व’ हे चित्तातील संस्कारांना अनुसरून असते. त्यामुळे आपल्याला व्यक्तीमत्त्वात सहजतेने पालट करता येत नाही. स्वतःचे विचार, निर्णय, कर्म आदींवरही चित्तातील संस्कारांचा प्रभाव असतो. एखादी गोष्ट करणे अयोग्य आहे, हे कळत असूनही चित्तातील संस्कारांच्या प्रभावामुळे ती गोष्ट टाळणे कठीण होते. त्यामुळे प्रारब्ध निर्माण होण्यामागे मुख्यतः चित्तातील संस्कारच कारणीभूत असतात. चित्तामध्ये जागरूकता अल्प असल्याने त्याला ‘अचेतन मन’ असेही म्हणतात. स्वतःची जागरूकता जितकी वाढेल, तितका चित्तातील संस्कारांचा प्रभाव न्यून होत जातो.

२ आ १. चित्त आणि ग्रह यांचा संबंध : कुंडलीतील ग्रहांमध्ये असणारे योग (संबंध) हे चित्तातील संस्कार दर्शवतात. या संस्कारांना अनुसरून स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू असतात. पुढील सारणीत काही महत्त्वाचे ग्रहयोग आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीमत्त्वाचे पैलू दिले आहेत.

२ आ २. जीवनातील परिस्थिती आणि ग्रह यांचा संबंध : प्रत्येक व्यक्तीचा जन्म विशिष्ट कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत होतो, तसेच व्यक्तीच्या जीवनात प्रतिदिन चांगल्या-वाईट घटना घडत असतात. या सर्वांचा व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावर परिणाम होत असतो. जन्मकुंडलीतील १२ स्थानांच्या स्थितीवरून व्यक्तीच्या वर्तमान जीवनातील चांगल्या-वाईट परिस्थितीचा तर्क काढता येतो.

अ. धर्मस्थाने : कुंडलीतील १, ५ आणि ९ या स्थानांना ‘धर्मस्थाने’ म्हणतात. या स्थानांवरून आरोग्य, बुद्धीमत्ता, शिक्षणातील यश, संतती, पूर्वपुण्याई आणि भाग्य यांचा बोध होतो. ही स्थाने दूषित असल्यास आरोग्य, शिक्षण आणि संतती यांच्या संदर्भात अडचणी येतात, तसेच भाग्याची साथ अल्प लाभते.

टीप – ‘स्थान दूषित असणे’ म्हणजे स्थानात प्रतिकूल ग्रह असणे; स्थानाचा स्वामी अशुभ स्थानात, अशुभ राशीत, शत्रूग्रहाच्या कुयोगात असणे इत्यादी.

आ. अर्थस्थाने : कुंडलीतील २, ६ आणि १० या स्थानांना ‘अर्थस्थाने’ म्हणतात. ही स्थाने व्यक्तीचे विशेष कार्य, कर्म, अधिकार, मालमत्ता, समाजातील स्थान इत्यादी दर्शवतात. ही स्थाने दूषित असल्यास आर्थिक संकटे येतात, अधिकार प्राप्त होत नाही आणि जीवनात एकंदर स्थैर्य अल्प असते.

इ. कामस्थाने : कुंडलीतील ३, ७ आणि ११ या स्थानांना ‘कामस्थाने’ म्हणतात. या स्थानांवरून ‘व्यक्तीचा जोडीदार, भागीदार, नातेवाईक, मित्र आणि समाज यांच्याशी संबंध कसे रहातील ?’, हे लक्षात येते. ही स्थाने दूषित असल्यास विवाह न टिकणे, इतरांकडून फसवणूक होणे, समाजात मानहानी होणे आदी परिणाम होऊ शकतात.

ई. मोक्षस्थाने : कुंडलीतील ४, ८ आणि १२ या स्थानांना ‘मोक्षस्थाने’ म्हणतात. ही स्थाने व्यक्तीच्या अंतर्मनातील संस्कार दर्शवतात. ‘अध्यात्मात प्रगती करण्यासाठी व्यक्तीची त्याग करण्याची क्षमता किती आहे ?’, हे त्या स्थानांवरून लक्षात येते. ही स्थाने दूषित असल्यास व्यक्तीत आध्यात्मिक प्रगल्भता अल्प असल्याने तिची आध्यात्मिक उन्नती होण्यास अडथळे येतात.’

(क्रमशः)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.५.२०२६)