राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीचा पुढाकार


राजापूर – पर्यावरणात होत असलेले पालट आणि त्यामुळे खालावलेली भूजल पातळी आणि भीषण पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी राजापूर पंचायत समितीने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. पावसाच्या पाण्याचे संकलन, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि पाणी बचतीविषयी जनजागृती करणारा ‘जलतारा योजना’ प्रकल्प तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

१. या प्रकल्पांतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला ‘जलतारा पुनर्भरण खड्डे’ खोदण्याचे २० खड्ड्यांचे उद्यिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये २०० हून अधिक पुनर्भरण खड्डे खोदण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागांतील पाणी संवर्धन होऊन भूजल पातळी वाढण्यास साहाय्य होईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, तसेच हा प्रकल्प शेतीसाठी लागणार्‍या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

२. पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव आणि गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे. प्रकल्पाच्या कामांसाठी शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुक्यातील अधिकाधिख नागरिक आणि शेतकरी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

३. यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. सध्या पावसाचे आगमन झाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातील संकट टळलेले नाही. हीच गंभीर गोष्ट ओळखून राजापूर पंचायत समितीने आतापासूनच भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘जलतारा योजना’ गतिमान करण्याचा निर्धार केला आहे.