प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !

मुंबई – महाराष्ट्रात एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या ११ महिन्यांच्या कालावधीत राज्य महिला आयोगाकडे १६ सहस्र ६०८ तक्रारी आल्या आहेत. या आकडेवारीनुसार राज्यात प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे १ सहस्र ५०९ तक्रारी येत आहेत. महिला आणि बालके यांच्यावरील अत्याचारांविषयी विधानसभेत २४ जून या दिवशी एका तारांकित प्रश्नावर महिला आणि बाल विकास विभागाकडून वरील आकडेवारी देण्यात आली आहे.

१६ सहस्र ६०८ तक्रारींपैकी २ सहस्र ७७७ तक्रारी कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. केंद्रशासनाच्या ‘राष्ट्रीय महिला सुरक्षा अभियाना’च्या अंतर्गत बलात्कार आणि ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यात १३८ जलदगती न्यायालये कार्यरत आहेत, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण विभागाकडून देण्यात आली.