स्त्रीत्वाचा उत्सव !

‘रज पर्व’ हा प्रामुख्याने ओडिशामध्ये साजरा केला जाणारा ३ ते ४ दिवसांचा कृषी आणि स्त्रीत्व यांचा उत्सव आहे. प्रतिवर्षी मध्य जूनमध्ये मान्सूनच्या आगमनासह हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ओडिशाच्या संस्कृतीमध्ये या सणाला एक अत्यंत सुंदर आणि पुरोगामी विचार जोडलेला आहे. अशी मान्यता आहे की, पावसाळ्याच्या प्रारंभीला भूमाता सजीव आणि फलदायी होते. ज्याप्रमाणे स्त्रीमध्ये प्रजनन क्षमतेचे लक्षण म्हणून मासिक पाळी येते; त्याचप्रमाणे या ३ दिवसांत भूदेवी, म्हणजेच धरतीमाता रजस्वला असते, असे मानले जाते. या काळात ती विश्रांती घेते आणि त्यानंतर पावसाच्या पाण्याने सुपीक होऊन ती नवीन पिकांच्या निर्मितीसाठी सिद्ध होते.

१. उत्सवाची पूर्वसिद्धता

हा सण प्रामुख्याने सलग ४ दिवस वेगवेगळ्या टप्प्यांत साजरा केला जातो. बिसबिजू म्हणजे सिद्धता म्हणून पुढच्या ४ दिवसांना लागणारे मसाले कुटून ठेवले जातात; कारण पुढच्या ४ दिवसांच्या काळात धरणीमातेला त्रास होईल, अशी कोणतीही कामे केली जात नाहीत !

वैद्य परीक्षित शेवडे

अ. पहिली रज हा सणाचा पहिला दिवस असतो, ज्या दिवशी पूर्वसिद्धता केली जाते आणि उत्सवाला प्रारंभ होतो.

आ. दुसरा आणि मुख्य दिवस, म्हणजे ‘रज संक्रांती किंवा मिथुन संक्रांती’. या दिवशी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो, जे पावसाळ्याच्या अधिकृत प्रारंभाचे प्रतीक मानले जाते.

इ. ‘बासी रज किंवा भू दाह’ हा उत्सवाचा तिसरा दिवस असतो, तर ‘बसुमती स्नान’ हा चौथा आणि शेवटचा दिवस असतो. या शेवटच्या दिवशी धरतीमातेचे प्रतीक म्हणून पाटा-वरवंटा स्वच्छ धुऊन त्याला हळद, कुंकू आणि फुले वाहिली जातात. याला भूदेवीचे ‘शुद्धी स्नान’ मानले जाते आणि धरतीला फळांचा नैवेद्य दाखवला जातो.

२. कशा प्रकारे उत्सव साजरा केला जातो ?

अ. हा सण निसर्ग आणि महिला यांच्या विश्रांतीवर भर देतो. या दिवसांत धरतीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून नांगरणी, पेरणी, झाडे तोडणे किंवा भूमी खणण्यासारखी कोणतीही कृषीविषयक कामे केली जात नाहीत, तसेच हा सण विशेषतः कुमारिका आणि महिला यांच्यासाठी असतो. त्यामुळे या ३ दिवसांत महिला घरातील कष्टाची कामे करत नाहीत.

आ. धरतीला त्रास होऊ नये म्हणून त्या शक्यतो अनवाणी पायांनी भूमीवर चालणे टाळतात. उत्सवाच्या कालावधीत मुली आणि महिला झाडांना बांधलेल्या अन् फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यांवर झुलतात, तसेच पारंपरिक उडिया लोकगीते गातात. झोपाळ्यांपर्यंत त्यांना उचलून नेले जाते. या झोपाळ्यांना ‘रज झुला’ असे म्हणतात.

इ. ओडिया संस्कृतीतील खास गोड पदार्थ जसे की, पोडो पिठा, मंडा पिठा आणि अरीशा पिठा या काळात आवर्जून बनवले अन् वाटले जातात. मुली नवीन कपडे परिधान करतात आणि पायांना अळता (लाल रंग) लावतात.

थोडक्यात सांगायचे, तर रज पर्व हा केवळ एक सण नसून तो निसर्ग, कृषी जीवन आणि स्त्रीची सृजनशीलता यांचा अत्यंत आदराने गौरव करणारा विचार आहे. देवी कामाख्या अंबुबाची मेळाप्रमाणेच ओडिशामधील मातृशक्तीचा सन्मान करणारा हा अनोखा सण !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.