हिंदु मंदिरांचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी न्यायालयीन लढा देणारे सर्वोच्च न्यायालयाचे धर्माभिमानी अधिवक्ता विष्णु शंकर जैन !

‘एक तरुण जेव्हा अधिवक्ता बनतो, तेव्हा त्याला ‘आपण एक यशस्वी व्यावसायिक अधिवक्ता बनावे आणि पुष्कळ पैसा कमवावा, सर्व सुखसुविधा मिळवाव्यात, महाधिवक्ता बनावे, उच्च न्यायालयाचे किंवा सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनावे, तसेच राजकारणात यावे’, असे वाटत असते. असे काहीही न करता अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मात्र धर्मरक्षणाचा काटेरी मार्ग निवडला. अयोध्येतील श्रीराममंदिराची न्यायालयीन लढाई जिंकून देण्यात प्रखर धर्माभिमानी पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांच्यासह त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचेही मोठे योगदान आहे. श्रीराममंदिरानंतर ते काशी, मथुरा, धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा अशा विविध मंदिरांच्या मुक्तीसाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत. त्यामुळे त्यांची देशात ‘टेंपल वॉरियर्स’ (मंदिर लढवय्ये) अशी ओळख बनली आहे. अधिवक्ता विष्णु जैन हे ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आहेत. ते वक्फ बोर्ड कायदा, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आदी हिंदुविरोधी कायद्यांच्या विरोधातही लढत आहेत. बंगालमध्ये हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार थांबवण्यासाठी तेथे राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे, यासाठी त्यांनी नुकतीच न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. वर्ष २०१९ च्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. पित्याप्रमाणे देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा वसा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९८६ या दिवशी झाला. त्यांनी लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांना राष्ट्र आणि धर्म यांच्या उदात्त कार्यासाठी न्यायालयीन  लढाया लढतांना पाहिले. त्यामुळे त्यांनीही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून वर्ष २०१० मध्ये बालाजी विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तेथून त्यांची कायद्याच्या क्षेत्रात कारकीर्द चालू झाली. वर्ष २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलीची पदवी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्याचा परवाना मिळाला. अधिवक्ता बनल्यानंतर त्यांनी पहिलाच खटला अयोध्या प्रकरणाचा सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केला. त्यांना ‘हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे आणि व्यवहारिकदृष्ट्या तोट्याचा आहे’, याची जाणीव होती. असे असतांनाही त्यांनी धर्मरक्षणाच्या मार्गावर जीवन झोकून दिले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी श्रद्धा आणि समर्पणभाव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा आहे. व्यासपीठ कोणतेही असो, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्मरण केल्याविना भाषणाला प्रारंभ करत नाहीत, तसेच कोणतेही यश मिळाल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाही ते विसरत नाहीत.

२. धर्मासाठी लढण्याची प्रेरणा कुठून मिळाली ?

हे सर्व कार्य पाहून अधिवक्ता जैन यांची आई त्यांना म्हणायची, ‘असे धोकादायक काम करून काय मिळणार आहे ? या मार्गात अनेक धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते.’ त्यामुळे ‘अशा प्रकारच्या गोष्टी न करता एक साधारण जीवन जगावे’, असे प्रत्येकच आईला वाटत असते. वर्ष १९९३-९४ मध्ये मुलायम सिंह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेव्हा अधिवक्ता विष्णु शंकर लहान होते. सिंह यांचे मुख्य सचिव ए.पी. सिंह यांनी एके रात्री घरी येऊन वडिलांना एक प्रस्ताव देऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे काम सोडण्याची चेतावणी दिली. तेव्हा वडील पू. अधिवक्ता हरि शंकर जैन स्वतःच्या तत्त्वावर ठाम राहिले आणि सिंह यांचा प्रस्ताव फेटाळला. हा प्रसंग अधिवक्ता विष्णु शंकर यांना धर्मासाठी लढण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन रामजन्मभूमी खटल्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जात असतांनाचा एक क्षण !

या एका प्रसंगानंतर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना धर्मासाठी लढण्याची कधीही न संपणारी प्रेरणा मिळाली. ते म्हणाले, ‘‘वर्ष २०१३ मध्ये वकिलीत मी नवीनच होतो आणि  देहलीत वकिली करत होतो. तेव्हा माझ्या वडिलांना (पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांना)  दम्याचा झटका आला. तेव्हा रुग्णालयात आधुनिक वैद्य म्हणाले, ‘वडिलांच्या जगण्याची शक्यता अल्प आहे. त्यांच्याकडे ‘व्हेंटिलेटर’ही नसल्याने पुढे काय करायचे, याविषयी ते काहीही सांगू शकत नाहीत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. ते ‘सेप्टिसीमिया’ने ग्रस्त आहेत आणि ते वाचण्याची शक्यता अल्प आहे.’ ते खरोखर मृत्यूशय्येवर पडलेले होते. त्या मृत्यूशय्येवरून माझ्या वडिलांनी मला सांगितले, ‘‘विष्णु, ‘टिलेवाली मशीद’ प्रकरणाची सूचना (नोटीस) पाठवायला विसरू नको. जर आपण अंतिम मुदत चुकवली, तर खटला रहित होऊ शकतो.’’ हे शब्द ऐकून मी पूर्णपणे हादरलो. यातून मला आपला समाज, देश, धर्म आणि राष्ट्र यांसाठी त्यांच्या मनात किती मोठी बांधिलकी आहे, हे दिसले. या घटनेनंतर मी निश्चय केला की, माझ्या आयुष्यात जो काही काळ शिल्लक असेल, तो मी शतकानुशतके आपल्यावर लादलेल्या ऐतिहासिक चुका आणि अन्याय दुरुस्त करण्यात घालवीन.’’

‘अपमानापासून सन्मानापर्यंत’चा खडतर प्रवास !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

पत्रकारांच्या गराड्यात वेढलेल्या अधिवक्ता विष्णु शंकर जैन या तरुण अधिवक्त्याला आपण दूरचित्रवाहिन्यांवर प्रतिदिन पहात असतो. श्रीराममंदिर असो, वक्फ कायदा असो, काशीविश्वेश्वर मंदिर असो किंवा मथुरेची श्रीकृष्ण जन्मभूमी असो, अशा विविध विषयांवर ते दूरचित्रवाहिन्यांवरील वादविवादांमध्ये हिंदूंची बाजू प्रभावीपणे मांडत असतात. राष्ट्रीय स्तरावरील न्यायालयीन विषयांवरही त्यांचे मत घेतले जाते. या स्तरावर येण्यासाठी त्यांना पुष्कळ कष्ट, अपमान आणि तिरस्कार सहन करावा लागला. मोठ्या हुद्यावरील लोक अधिवक्ता विष्णु जैन यांना म्हणायचे, ‘बेटा, तू वडिलांसारखा (पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांच्यासारखा) बनू नकोस !

ते जीवनात प्रगती करू शकले नाहीत. ते ज्या फांदीवर बसतात, ती फांदीच ते तोडून टाकतात. ते वेडे आहेत.’ हे ऐकून अधिवक्ता विष्णु शंकर नाउमेद झाले नाहीत. उलट राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी लढण्याचा त्यांचा निर्धार अधिकच दृढ होत गेला. (खरे तर पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी या जन्मात ऐहिक आणि पारमार्थिक दृष्ट्या जे साध्य केले आहे, ते त्यांच्यावर टीका करणार्‍यांना कधीतरी कळेल का ? त्यांनी जे साध्य केले आहे, ते साध्य करण्यासाठी आणि ते कळण्यासाठी जन्मोजन्मीची साधना असावी लागते. – संपादक)

३. भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ बनावे, या ध्येयासाठी वैयक्तिक आयुष्याचे समर्पण

जून-जुलै या सुट्टीच्या काळात सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि अधिवक्ते विदेशात फिरायला जातात. तेव्हा अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे वाराणसी, काशी यांचे स्थानिक खटले पहात असतात किंवा गावोगावी फिरून हिंदुविरोधी कायद्यांविषयी जनजागृती करत असतात. त्यांना त्यांच्या व्यवसायातून जे काही अर्थार्जन होते, ते सर्व राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी वापरतात. ‘भारतात रामराज्याची आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी. हा देश अखंड ‘हिंदु राष्ट्र’ बनावा. हिंदुत्वाची ओळख संपूर्ण जगाला व्हावी’, असेच त्यांना वाटत असते. प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांचे दर्शन सर्व जगाला मिळावे, हेच त्यांचे ध्येय आहे.

आकुर्डी (पुणे) येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळा’च्या वतीने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना नुकताच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.

४. विविध कार्यक्रम, अधिवेशने आणि परिषदा यांच्या माध्यमातून न्यायालयीन जागृती

न्यायालयीन कामकाजात व्यस्त असूनही ते देशभरात होणार्‍या महत्त्वाच्या परिषदा आणि अधिवेशने यांना उपस्थित रहात असतात. गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये त्यांची प्रत्येक वर्षी उपस्थिती असते. या माध्यमातून ते हिंदुत्वनिष्ठांचे कायद्यांविषयी प्रबोधन करत असतात. यासमवेतच ते विविध अधिवक्ता परिषदांना उपस्थित राहून अधिवक्त्यांनाही संबोधित करतात.

गौरीशृंगारदेवीची पूजा करण्याची अनुमती मिळाल्याचा आनंद व्यक्त करतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी मंदिर अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले. त्यात सहभागी होऊन मंदिर विश्वस्तांना संबंधित कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. विविध संघटनांच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतात.

शरिरात प्राण असेपर्यंत धर्मासाठी लढणार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

शरिरात प्राण असेपर्यंत मी धर्मासाठी लढणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही श्रीराममंदिरासाठी खटला लढवला, त्याचप्रमाणे ज्ञानवापीसाठी आणि मथुरेसाठी खटला लढवत आहोत. मध्यप्रदेशातील भोज येथील सरस्वतीमातेच्या मंदिरासाठीही खटला लढवत आहोत. ‘ज्ञानवापी मुक्त झाली पाहिजे’, ही छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची इच्छा होती, त्यासाठी आम्ही हे खटले लढवत आहोत. काही दिवसांपूर्वी मी शनिवारवाड्याला भेट दिली, तेव्हा तिथे अखंड हिंदुस्थानचे चित्र तुटलेल्या स्थितीत आढळले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अखंड हिंदु राष्ट्राचे स्वप्न होते. त्यासाठी ते चित्र परत चांगल्या स्थितीत यावे, यासाठी प्रयत्न व्हावेत.

५. वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून हिंदूंची बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना विविध वृत्तवाहिन्यांवर हिंदु वारसास्थळे आणि हिंदुविरोधी कायदे यांविषयी चर्चेसाठी बोलावले जाते, तसेच त्यांच्याशी वार्तालाप केला जातो. त्या माध्यमातूनही ते हिंदु धर्माच्या बाजूने सडेतोड प्रतिवाद करतात आणि स्वतःचा धर्माभिमान प्रकट करतात. यातून त्यांची धर्मरक्षणाची तळमळ दिसून येते.


धार्मिक वारसा स्थळांचे संरक्षण आणि ती पुनर्संचयित करण्यासाठी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे कायदेशीर प्रयत्न !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि त्यांचे वडील पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी अयोध्या, मथुरा, काशी, ताजमहल, भोजशाळा, कुतूबमिनार या सर्व प्रकरणांवर सखोल संशोधन केलेले आहे. या सर्व प्रकरणी त्यांनी पाया सिद्ध केला आहे. या प्रकरणांमध्ये यश मिळेपर्यंत आयुष्याच्या शेवटपर्यंत लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.

१. धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा प्रकरण

भोजशाळा   

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी इंदूर (मध्यप्रदेश) येथील जिल्हा न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे. त्यात ‘हिंदूंना भोजशाळा येथील श्री सरस्वती मंदिरात वर्षभर पूजा करण्याचा धार्मिक अधिकार देण्यात यावा’, अशी मागणी केली आहे, तसेच त्यांनी भोजशाळा प्रकरणी पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका केली आहे. या प्रकरणी त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात ठोसपणे युक्तीवाद केला आहे.

२. संभल (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद आणि श्री हरिहर मंदिर प्रकरण  

जामा मसजीद संभल

संभलच्या जामा मशिदीच्या ठिकाणी श्री हरिहर मंदिर असल्याचा दावा अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी जिल्हा न्यायालयात प्रविष्ट केला. त्यानंतर जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. सर्वेक्षण चमूसह तेही तेथे उपस्थित होते. या काळात धर्मांधांनी दगडफेक करून दंगल केली. त्या माध्यमातून त्यांचा अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे प्राण घेण्याचा उद्देश होता. पोलिसांनी कारवाई करून कह्यात घेतलेल्या धर्मांध आरोपीने तसे मान्यही केले आहे.

३. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ला आव्हान 

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ या कायद्याद्वारे हिंदूंचा आवाज दाबण्यात आला आहे. वर्ष १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी केलेल्या या कायद्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीची धार्मिक स्थळे ज्या स्वरूपात होती, त्याच स्थितीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कायद्याने मंदिराविषयी न्यायालयात जाण्याचा हिंदूंचा अधिकार काढून घेण्यात आला. या कायद्याद्वारे मंदिरांच्या इस्लामी धार्मिक स्थळात झालेला पालट कायम ठेवण्यात आला आहे. याविरोधात अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि त्यांचे वडील पू. हरि शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

४. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद प्रकरण 

मथुरा येथे श्रीकृष्णजन्मभूमीच्या ठिकाणी शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली आहे. ही भूमी परत हिंदूंना मिळावी, यासाठी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे. याप्रकरणी मुसलमान पक्ष सर्वाेच्च न्यायालयात गेल्यामुळे तेथेही सुनावणी चालू आहे.

५. वक्फ बोर्डाला आव्हान 

वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्या विरोधात अधिवक्ता विष्णु  जैन यांनी ‘वक्फ ॲक्ट १९९५’ मधील असंवैधानिक प्रावधानांना सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार केला आहे.

६. आग्रा येथील ताजमहाल प्रकरण 

वर्ष २००५ मध्ये ताजमहाल ही वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे घोषित करण्यात आले. या दाव्याला अधिवक्ता विष्णु जैन यांनी विरोध दर्शवला असून ते या दाव्याला कायदेशीरपणे आव्हान देत आहेत. त्यांच्या मते, ताजमहल हा शहाजहांने बनवला नव्हता, तर तो राजा जयसिंह याचा महल होता, जी शहाजहांच्या ३०० वर्षांपूर्वीची ही रचना आहे.

७. कुतूबमिनारच्या ठिकाणी पूजा करू देण्याची मागणी  

कुतुब मीनार

कुतूबमिनारच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा दावा अधिवक्ता विष्णु जैन यांनी केला आहे. त्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती मिळावी, अशी अधिवक्ता जैन यांनी मागणी केली आहे.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷