पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर

शिंगवे पारगाव येथील बालिका विनयभंग प्रकरणाच्या निषेधार्थ ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’

आमदार गोपीचंद पडळकर

पुणे – ‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे. दिवसाढवळ्या अतीप्रसंग करणार्‍या अशा प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. येत्या १५ दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट केले पाहिजे,’ अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. शिंगवे पारगाव (ता. आंबेगाव) येथे ४ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग केल्याच्या निषेधार्थ १२ जुलै या दिवशी ग्रामस्थ आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या मोर्चात बहुसंख्येने नागरिक, महिला, तरुण वर्ग आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ १२ जुलै या दिवशी संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील परप्रांतीय आरोपी महंमद फरदीन शहा याच्यासह त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. गावातील श्री भैरवनाथ मंदिर येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

ह.भ.प. संग्रामबापू भंडारे

ह.भ.प. संग्रामबापू भंडारे म्हणाले, ‘‘प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीच्या सुरक्षेविषयी अधिक जागरूक राहिले पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई व्हावी.’’

संपादकीय भूमिका

अशी मागणी आणि असा मोर्चा का काढावा लागतो ? पोलिसांनीच हे पुढाकार घेऊन करणे आवश्यक आहे !