कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !

पोलीस अधीक्षकांना निवेदन देतांना ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रतिनिधी

कोल्हापूर – पाकिस्तानस्थित गुंडाशी संपर्क असल्याच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही तरुणांची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जनतेतील चिंता दूर करण्यासाठी ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. निष्पक्ष अन्वेषण होऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हाच या निवेदनाचा उद्देश आहे, असे ‘हिंदु एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी सांगितले. या वेळी शहराध्यक्ष विलास मोहिते, आनंदराव कवडे, हिंदुराव शेळके यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी या मागण्यांची नोंद घेत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदनातील मुख्य मागण्या

१. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड न करता, देशविरोधी कारवाया करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी. समाजात अफवा पसरू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसिद्ध करावी.

२. संशयास्पद सामाजिक माध्यमांचे जाळे आणि आर्थिक व्यवहार यांची सखोल चौकशी व्हावी.

३. संवेदनशील भागांत पोलीस गस्त वाढवून संशयास्पद हालचालींसाठी स्वतंत्र ‘हेल्पलाईन’ चालू करावी.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून सखोल अन्वेषण केव्हा करणार ?