योग आणि आयुर्वेद यांना जागतिक स्तरावर पोचवणारे हरिद्वार (उत्तराखंड) येथील योगऋषी रामदेवबाबा !

हरिद्वार (उत्तराखंड) येथील योगऋषी रामदेवबाबा हे ‘योगगुरु’ म्हणून भारतासह संपूर्ण जगाला एक सुपरिचित नाव आहे. ते उत्तराखंडमधील ‘पतंजलि योगपीठ’ आणि ‘पतंजलि आयुर्वेद लिमिटेड’ यांचे सहसंस्थापक आहेत. ते भारतातील एक वलंयाकित व्यक्ती असून भारताचे राजकारण आणि अध्यात्म यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी देश-विदेशात अनेक योग शिबिरे घेतली, तसेच त्यांची विविध दूरचित्रवाहिन्यांवर योगसत्रे प्रसारित होत असतात. त्यामुळे योग आणि आयुर्वेद जगभरात पोचण्यास साहाय्य झाले. स्वामीजींनी वर्ष २०१० मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात चळवळ चालू केली. त्यांनी ‘योग साधना एवम् योग चिकित्सा रहस्य’ आणि ‘प्राणायम रहस्य’ ही दोन लोकप्रिय हिंदी पुस्तके लिहिली. त्यात त्यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी लोकांना सनातन धर्म आणि संस्कृती यांच्याशी जोडण्यासाठी प्रेरित केले. त्यांना ‘कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर’ कडून त्यांना मानद ‘डॉक्टरेट’ पदवी मिळाली आहे. वर्ष २०१७ मध्ये ‘इंडिया टुडे’ने त्यांचा ५० ‘सर्वांत प्रभावशाली व्यक्तीं’च्या सूचीत समावेश केला. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’नेही १०० मधून ७८ वे ‘सर्वांत शक्तीशाली भारतीय’ म्हणून त्यांना सूचीबद्ध केले होते.

योगऋषी रामदेवबाबा

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या   हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. ज्ञानार्जन आणि कठोर तपस्या

योगऋषी रामदेवबाबा यांचे मूळ नाव राम किशोर यादव आहे. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९६५ या दिवशी हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातरील अलीपूर येथे झाला. प्रारंभीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना कलवा (जिंद, हरियाणा) येथील गुरुकुलात प्रवेश मिळाला. तिथे त्यांनी संस्कृत आणि योग यांचा अभ्यास केला. आचार्य श्री. बलदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृत व्याकरण, योग, दर्शन, वेद आणि उपनिषदे यांमध्ये विशेष ज्ञान असलेली ‘पदव्युत्तर (आचार्य)’ पदवी प्राप्त केली. महर्षि दयानंद यांचे जीवन आणि लेखन यांनी प्रेरित झाल्यानंतर त्यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ आणि ‘ऋग्वेदादिभाष्य भूमिका’ या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. लहानपणापासूनच त्यांनी स्वतःला ब्रह्मचर्य आणि तपस्वी जीवन जगण्यास समर्पित केले होते. त्यामुळे गुरुकुलामध्ये ‘योग’, पाणिनींचे ‘अष्टाध्यायी’ आणि पतंजलींचे ‘महाभाष्य’ हे शिकल्यानंतर ते हिमालयातील गंगोत्री लेण्यांच्या प्रवासाला निघाले. त्यांनी सखोल ध्यान आणि कठोर तपस्या यांद्वारे त्यांचे ध्येय निश्चित केले. वर्ष १९९२ मध्ये हरिद्वार येथील कृपालू बाग आश्रमात योगाचे शिक्षण घेतले आणि संन्यास घेऊन ‘रामदेव’ हे नाव धारण केले.

योगऋषी रामदेवबाबा यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला दिलेली भेट आणि काढलेले गौरवोद्गार !

योगऋषी रामदेवबाबा यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी योगऋषी रामदेवबाबा आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाली होती.

योगऋषी रामदेवबाबा आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट

सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतांना योगऋषी रामदेवबाबा म्हणाले, ‘‘सनातन संस्था अत्यंत प्रामाणिकपणे आणि नि:स्वार्थीपणे हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करत आहे. या कार्यास थोडा कालावधी लागणार असला, तरी ते निश्चितपणे होणारच आहे. अहंकार न्यून असलेलेच हे कार्य करू शकतात. एकूणच भागवद्धर्माला मूर्तरूप देण्याचे कार्य ‘सनातन संस्था’ करत आहे.’’

हे ही वाचा : योगऋषी रामदेवबाबा यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला चरणस्पर्श !

२. योग आणि आयुर्वेद यांचा देश-विदेशात प्रसार

योग आणि भारतीय आयुर्वेदाची औषधे यांनी देश निरोगी, समृद्ध अन् शक्तीशाली बनवता येतो, हे लक्षात घेऊन त्यांनी जगभर योग आणि आयुर्वेद यांचा प्रसार करण्याचे, तसेच भारताच्या सामाजिक, राजकीय अन् आर्थिक व्यवस्थेत सुधारणा करण्याचे ठरवले. कालांतराने त्यांची भेट आचार्य बाळकृष्ण यांच्याशी झाली.

आचार्य बाळकृष्ण आणि योगऋषी रामदेवबाबा

स्वामीजींनी ‘पतंजली’च्या योगाचे रहस्य उलगडण्याचे आणि ते लोकप्रिय करण्याचे दायित्व स्वतःवर घेतले, तर आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदाच्या औषधपद्धतींच्या प्रभावतेवर लोकांचा विश्वास पुनर्संचयित करण्याच्या कार्यात स्वतःला समर्पित केले. देश-विदेशातील लोकांनी योग आणि आयुर्वेद यांना त्यांची जीवनशैली म्हणून स्वीकारावे, यासाठी त्यांनी वर्ष १९९५ मध्ये कानखल, हरिद्वार, उत्तराखंड येथे ‘दिव्य योग मंदिर (ट्रस्ट)’ची स्थापना केली. त्यानंतर ‘ब्रह्मकल्प चिकित्सालय’, ‘दिव्य फार्मसी’, ‘दिव्य प्रकाशन’, ‘दिव्य योग साधना’, ‘पतंजलि योगपीठ’, ‘भारत स्वाभिमान (ट्रस्ट)’, इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे कार्य पुढे नेले.

हिंदु राष्ट्राविषयी योगऋषी रामदेवबाबा यांचे विचार !

‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, असे योगऋषी रामदेवबाबा यांना वाटते. त्यांच्या मते ‘भारत हे सनातन धर्माची संस्कृती आणि मूल्ये यांवर आधारित राष्ट्र असावे. राष्ट्र उभारणीसाठी प्रथम हिंदु संस्कृती आणि मूल्ये यांचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ एक धार्मिक राष्ट्र नाही, तर ज्याला त्याची संस्कृती, परंपरा आणि मूल्ये यांचा अभिमान आहे, असे राष्ट्र ! भारताला एक बलशाली आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला आपल्या मुळांशी जोडले पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पाहिजे. संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनेल, असे भारत राष्ट्र असावे.’ योगऋषी रामदेवबाबा त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये अनेक वेळा हिंदु राष्ट्राचा उल्लेख करतात.

३. ‘भारत स्वाभिमान चळवळी’च्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई

योगऋषी रामदेवबाबांना व्यसनमुक्त, शाकाहारी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत अपेक्षित आहे. भारतातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून जनतेसाठी एक चांगला आणि प्रामाणिक समाज निर्माण करणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांनी ‘भारत स्वाभिमान चळवळ’ चालू केली. त्यात त्यांनी पुढे येऊन देश आणि लोकशाही बलशाली करण्याचे लोकांना आवाहन केले. त्यांनी २०११ मध्ये विदेशात दडवलेल्या काळ्या पैशाविरुद्ध मोहीम चालू केली, तसेच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात देहली येथे सत्याग्रह आंदोलनही केले, जे तत्कालीन काँग्रेस सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामध्ये त्यांनी ‘काळा पैसा परकीय बँकांमध्ये साठवणार्‍यांना राजद्रोही म्हणून जाहीर करावे आणि तो राष्ट्रीय गुन्हा मानण्यात यावा, भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्यांना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी’, यांसह अन्यही मागण्या करण्यात आल्या.

सनातन धर्मातील गुरुकुल पद्धतीच्या पुनुरुत्थानासंदर्भात बोलतांना योगऋषी रामदेव बाबा –

स्वामी रामदेव : युद्ध काल में देशवासियों का कर्तव्य !

४. भारतीय सैनिकांना योगाचे प्रशिक्षण

‘देश निरोगी ठेवण्यासाठी सैन्यातील सैनिकांनाही योग शिकवला पाहिजे’, असे योगऋषी रामदेवबाबा यांना वाटते. हे लक्षात घेऊन त्यांनी जैसलमेरमध्ये सैनिकांना योग शिकवण्यास प्रारंभ केला, तसेच देहलीमध्ये सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी योग शिबिरे आयोजित केली.

योगऋषी रामदेवबाबा यांना मिळालेले काही सन्मान !

योगऋषी रामदेवबाबा

अ. वर्ष २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत गरिबी निर्मूलनावर व्याख्यान देण्यासाठी योगऋषी रामदेवबाबा यांना आमंत्रित करण्यात आले होते.

आ. वर्ष २००९ मध्ये राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपति यांनी त्यांना ‘महामहोपाध्याय’ पदवीने सन्मानित केले.

इ. वर्ष २०११ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते ‘श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

ई. वर्ष २०१२ मध्ये कर्णावती (गुजरात) येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आयकॉन श्रेणीतील ‘तरुण क्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷