गरम शेक आणि गार शेक

सांधे आणि आसमंतातील दुखणी नवीन असतात, सूज असते, लालीमा असतो, तेव्हा कधीतरी कुणीतरी ‘आईस पॅक’ने (बर्फाच्या पिशवीने) शेकायला सांगितलेले असते. हळू हळू करत आजार जुना होत जातो. मग जुनाट संधीवात, सांधेदुखी आणि पाठदुखी यांमध्ये पुष्कळ पूर्वी सांगितलेला/ऐकलेला एखादा उपाय परत परत करत रुग्ण वर्षानुवर्ष बर्फाने किंवा आईस पॅकने सांधे शेकत रहातात. एक सूत्र येथे लक्षात घ्यायला हवे, ‘अपघात झाल्याने मुरगळून होणार्‍या वेदना, मार लागून आलेले टेंगूळ अशात २४ ते ४८ घंटे किंवा जुन्या दुखण्याला नवीन मार लागला, तर फार तर केवळ गार शेक दिला जातो, तेसुद्धा तात्पुरती सूज आणि वेदना न्यून करायला. दुखणे बरे व्हायला नाही, जुन्या दुखण्यात तर अगदीच नाही.’

१. आयुर्वेदात शेकण्याविषयी सांगितलेली सूत्रे तर्कसंगत

शरिरात काहीतरी रोगावस्था निर्माण होऊन या गोष्टी घडत असतात. त्या ठिकाणी गार शेकाचे प्रयोजन अजिबात रहात नाही. यामध्ये ‘आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकदमच विरुद्ध आहे.’ ‘आयुर्वेदात वेगळेच उलटे सांगितलेले असते ना’, असे म्हटले जाते; पण तसे नसून उलट शास्त्रीय कसोट्यांवर लागू होणारे, अतिशय ‘लॉजिकल’ (तर्कसंगत) आणि अवस्थेनुसार उपयोगी अशा चिकित्सा आयुर्वेदात आहेत. ‘लूपहोल’ हा की, रुग्णालयात एकदा रुग्ण जाऊन आला की, त्याच्यापर्यंत गोष्टी पुढेपर्यंत तर्कसंगतपणे समजावून पोचवल्या जात नाहीत. त्यातून गैरसमज होत राहून वर्षानुवर्ष दुखावलेले सांधे रुग्ण गार वस्तूने शेकत रहातात.

२. आयुर्वेदानुसार शेक देण्याचे प्रकार

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

आपण जेव्हा सरसकट सगळ्या सांध्याच्या आणि स्नायूंच्या दुखण्यावर बर्फाने शेकत रहातो, म्हणजे त्या भागातील वात न्यून करायच्या ऐवजी वाढवतो आणि आजार बरा होण्यापेक्षा वाढवतो. आयुर्वेदामध्ये शेक देण्याचेही अनेक प्रकार रोगाची लक्षणे आणि अवस्थेनुसार सांगितले आहेत.

अ. सांधे सुजणे किंवा वेदना या ठिकाणी वात शमन होणे, या दृष्टीने पोटातील औषधांसह ज्या वेळी बाहेरून शेक दिला जातो, तो गरम किंवा कोमट गोष्टींचाच अपेक्षित आहे.

आ. वनस्पती लेप, सिद्ध तेल धारा, वाळूचे अन् वीट यांचे कोरडे शेक, सूज आणि वेदना न्यून करणार्‍या नुसत्या पानांचे बांधून शेक अन् अजून असे अनेक प्रकार आहेत.

इ. सांधेदुखी, सांध्यातून कटकट आवाज, अल्प सूज; पण वेदना अधिक अशा ठिकाणी सिद्ध तेलाने स्नेहन, लेप आणि शेक (लेप, धारा, अभ्यंग स्वरूपात), दुधाचे शेक यांतील आवश्यकतेनुसार प्रकार ठरवला जातो. वेदना व्हायचे सांधे पालटत असतील आणि सूज येत असेल, तर औषधांसह तेथील त्रास न्यून करणारे औषधी सिद्ध तेल आणि शेक / कोरडा शेक / पानांचा शेक / वाळूचा शेक बर्‍याचदा दिला जातो.

३. सतत शेक घेऊन दुखणे वेगळे स्वरूप धारण करत नाही ना ?

सांगण्याचा मुद्दा इतकाच की, जुन्या वेदना असलेल्या सांध्यांना गार शेकाने तेथील भाग बधीर होऊन वेदना न्यून झाल्याचा तात्पुरता भास निर्माण होतो; पण उलट ते बरे होण्याची प्रक्रिया मंदावते. तेच तेच सांधे वर्षानुवर्षे बर्फाने शेकू नयेत, वेदना न्यून तर होत नाहीत आणि वात वाढून व्याधी बळावण्याची शक्यताच अधिक.

सगळ्या सांधेदुखीला तेल चालत नाही, सगळ्याला सतत केवळ शेक उपयोगी नसतो, उलट त्यानेही सांध्यांच्या ठिकाणी वेदना वाढते. दुखणे हे वाताचे नसून सांध्याच्या आसपास होऊ घातलेले एखादे गळू आणि मधुमेह यांच्या रुग्णांमध्ये विशेषकरून पायावर ‘सेल्युलायटीस’चा प्रारंभ किंवा कंबर किंवा पाठीवर नागीणीचे पूर्वरूप अशा पद्धतीचे काही असेल, तर शेकण्याने दुखणे जोरदार वेगळीकडेच जाते.

‘Knowing when to stop’ (कुठे थांबायचे हे कळणे), हे कुठल्याही निर्णयाविषयी फार महत्त्वाचे असते. आपल्याला शेक चालेल का ? आणि कुठल्या प्रकारचा शेक किती काळ चालेल ? ते विचारून रोग बरा होण्याच्या दृष्टीने वैद्यांच्या सल्ल्याने औषधे आणि पथ्य असे पूर्ण चिकित्सा उपाय केव्हाही अधिक उपयोगी.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.