अहंकार कि सत्याचा शोध ?

डॉ. महेंद्रलाल सरकार हे ब्रिटीश सत्ताकालीन भारतात वैद्यकीय विश्वातील एक अत्यंत आदराचे नाव होते. कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून ‘एम्.डी.’ची पदवी मिळवणारे ते दुसरे भारतीय. ‘ब्रिटीश मेडिकल असोसिएशन’च्या बंगाल शाखेचे ते उपाध्यक्ष होते. आजसारखेच त्या वेळीही पाश्चात्य वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) हेच एकमेव शास्त्रीय सत्य मानले जायचे. या व्यवस्थेच्या शिखरावर बसलेले डॉ. सरकार स्वतः प्रारंभीला होमिओपॅथीला अशास्त्रीय मानत असत.

डॉ. महेंद्रलाल सरकार यांना ब्रिटिशांकडून होणाऱ्या विरोधाविषयी प्रातिनिधिक रेखाचित्र   (सौजन्य: श्री व्यंकटेश आयुर्वेद)

१. डॉ. महेंद्रलाल सरकार यांनी होमिओपॅथीचे त्रुटी दाखवण्याऐवजी परीक्षणातून प्राप्त झालेले सकारात्मक परिणाम मांडणे

होमिओपॅथीमधील त्रुटी दाखवून देण्यासाठी जेव्हा त्यांनी बाबू राजेंद्रलाल दत्त यांच्यासह प्रत्यक्ष रुग्णांवर परीक्षण करण्यास प्रारंभ केला, तेव्हा त्यांना अनपेक्षित निकाल दिसले. जे औषधोपचार त्यांच्या मते ‘थोतांड’ होते, ते प्रत्यक्षात रुग्णांना बरे करत होते ! येथे डॉ. सरकार यांच्यातील खरा ‘संशोधक’ जागा झाला. स्वतःच्या आजवरच्या समजूतींना खोटे ठरवणे, हे सोपे नसते. त्यासाठी प्रचंड बौद्धिक प्रामाणिकपणा लागतो. १६ फेब्रुवारी १८६७ या दिवशी झालेल्या ‘ब्रिटीश मेडिकल असोसिएशन’च्या बैठकीत त्यांनी अत्यंत नम्रपणे स्वतःचे निरीक्षण मांडले आणि होिमओपॅथीचे परिणाम सकारात्मक असल्याचे घोषित केले.

डॉ. सरकार यांच्या या घोषणेनंतर तत्कालीन आधुनिक वैद्यकीय वर्तुळातून जी प्रतिक्रिया आली, ती विज्ञानाला धरून नव्हती, तर ती दुखावलेल्या प्रतिष्ठेतून आलेली होती.

२. तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेने डॉ. सरकार यांना बहिष्कृत करण्यासाठी केलेला प्रयत्न 

वैद्य परीक्षित शेवडे

एखाद्या नव्या प्रयोगाचे निकाल समोर आल्यावर ‘चला, आपणही हे पडताळून पाहूया’ किंवा ‘यामागे काय विज्ञान असावे ?’,

असा विचार करणे अपेक्षित असते; परंतु तत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेने संवाद आणि परीक्षण यांचे सर्व दरवाजे बंद करणे पसंत केले. यामागे एक अलिखित मानसिकता होती, ‘आम्ही जे शिकलो आहोत, तेच अंतिम ज्ञान आहे. आमच्या चौकटीबाहेरचे काहीही सत्य असूच शकत नाही.’

जेव्हा एखाद्या व्यवस्थेला आपल्या ज्ञानाचा अवाजवी अभिमान वाटू लागतो, तेव्हा ती व्यवस्था नव्या विचारांना ‘आव्हान’ न मानता ‘अपमान’ मानू लागते. डॉ. सरकार यांच्यासह नेमके हेच झाले.

अ. त्यांच्या निरीक्षणांवर शास्त्रीय चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला.

आ. त्यांना असोसिएशनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

इ. त्यांच्या उत्तम चालू असलेल्या वैद्यकीय प्रॅक्टिसवर (वैद्यकीय व्यवसायावर) त्यांच्याच पदवीधर बांधवांकडून अघोषित बंदी आणली गेली. त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) रहित करण्यापर्यंत मजल गेली.

तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेने डॉ. सरकार यांना एकटे पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हा केवळ एका डॉक्टरचा विरोध नव्हता, तर ती एका प्रस्थापित संस्थेने तिच्या वर्चस्वाला धक्का लागू नये म्हणून केलेली कृती होती; पण ज्ञानाच्या क्षेत्रातील अहंकार कधीही सत्याचा मार्ग रोखू शकत नाही.

डॉ. महेंद्रलाल सरकार यांच्याबद्दल अजून कांही . . . 

३. प्रस्थापित अहंगंडाचा आणि सत्याच्या शोधाचा एक अत्यंत बोलका अध्याय

डॉ. सरकार डगमगले नाहीत. ज्या व्यवस्थेने त्यांना नाकारले, त्याच व्यवस्थेच्या डोळ्यांदेखत त्यांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस चालू केली आणि बघता बघता ते भारतातील सर्वांत यशस्वी होमिओपॅथी डॉक्टर बनले. त्यांची ही प्रॅक्टिस आधीच्या ॲलोपॅथी प्रॅक्टिसपेक्षाही अधिक यशस्वी ठरली.

एवढेच नव्हे, तर विज्ञान हे केवळ एका विशिष्ट शाखेची मक्तेदारी असू नये, या विचारातून त्यांनी पुढे ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (आय.ए.सी.एस्.)’ची स्थापना केली. याच संस्थेद्वारे काम केलेल्या डॉ. सी.व्ही. रामन यांना वर्ष १९३० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. विज्ञानातील नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले व्यक्ती ठरले.

विज्ञानाचा मूळ पाया हा ‘सत्याचा शोध’ आणि ‘खुल्या मनाने केलेले परीक्षण’ यांवर उभा असतो; पण जेव्हा एखाद्या विशिष्ट ज्ञानशाखेला ‘आपणच अंतिम सत्य आहोत’, असा भास होऊ लागतो, तेव्हा तिथे खर्‍या विज्ञानाची जागा एका सूक्ष्म अहंगंडाला मिळते. १९ व्या शतकातील बंगालमध्ये डॉ. महेंद्रलाल सरकार यांच्या वाट्याला आलेला संघर्ष हा याच प्रस्थापित अहंगंडाचा आणि सत्याच्या शोधाचा एक अत्यंत बोलका अध्याय आहे !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (११.७.२०२६)