Ukraine War : युक्रेनविरुद्धच्या युद्धात चिनी नागरिक रशियाच्या बाजूने लढत आहेत ! – युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

  • युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांचा दावा

  • यापूर्वी २ चिनी नागरिकांना अटक केल्याचीही दिली माहिती

कीव (युक्रेन) – रशिया सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या सैन्यात चिनी नागरिकांची भरती करत आहे. रशियाच्या बाजूने लढणार्‍या १५५ चिनी नागरिकांची ओळख युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने पटवली आहे. ही संख्या अधिकही असू शकते. ओळख पटवलेल्या सर्व लोकांची नावे आणि पारपत्र यांचा तपशील आहे, असा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी २ चिनी नागरिकांना पकडल्याचाही दावा केला होता.

झेलेंस्की पुढे म्हणाले की, चीनलाही या गोष्टीची जाणीव आहे. भरती करणार्‍यांना चीनकडून सूचना मिळत आहेत कि नाही ? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अटक केलेल्या चिनी नागरिकांकडून ओळखपत्रे, बँक कार्ड आदी जप्त करण्यात आले आहे. त्यांचा एक व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकरणात रशियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

रशिया चीनला युद्धात ओढत आहे !

झेलेंस्की पुढे म्हणाले की, रशिया या युद्धात चीनला ओढत आहे. हा पुतिनच्या योजनेचा एक भाग आहे. पुतिन यांना युद्ध युरोपमध्ये पसरवायचे आहे.

चीनने फेटाळला झेलेंस्की यांचा दावा !

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले की, चीनच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. चीन सरकारने नेहमीच नागरिकांना युद्धक्षेत्रांपासून दूर रहाण्यास आणि कोणत्याही प्रकारच्या लढाईत सहभागी होऊ नये, असे सांगितले आहे. चीन युक्रेनशी चर्चेद्वारे या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवत आहे.

चीन रशियाला युद्धासाठी प्रोत्साहन देतो ! – अमेरिका

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस या विषयावर म्हणाल्या की, चीन रशियाचा समर्थक आहे आणि तो युद्धाला प्रोत्साहन देत आहे. रशियाने यापूर्वी चीनला ड्रोनचे भाग आणि मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स पुरवले आहेत; परंतु सैन्याची उपस्थिती आश्चर्यकारक आहे.