
मॉस्को – जागतिक स्तरावर तणाव वाढत असल्याने येत्या काळात अधिक देश अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोचले आहे, असे वक्तव्य रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी केले आहे. त्यांनी जगातील वाढत्या अण्वस्त्र शर्यतीसाठी पाश्चात्त्य देशांना उत्तरदायी ठरवले आहे. ते म्हणाले की, पाश्चात्त्य देश युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध छुपे युद्ध करत आहेत. जगात अण्वस्त्रांचा धोका वाढत आहे आणि परिस्थिती महायुद्धासारखी झाली आहे. मेदवेदेव यांनी रशिया आणि अमेरिका यांच्यात वर्ष २०१० या काळात झालेल्या ‘स्टार्ट’ कराराविषयी चर्चा केली. दोन्ही देशांमधील अण्वस्त्र स्पर्धा अल्प करण्यासाठी हा करार अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्यात झाला होता. हा करार फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार आहे.
१. मेदवेदेव पुढे म्हणाले की, पाश्चात्त्य देश रशियाला कमकुवत करण्यासाठी युक्रेनचा वापर करत आहेत. त्यामुळे रशियाला वाटते की, देशाच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रे राखणे आवश्यक आहे.
२. ‘अमेरिकन सायंटिस्ट्स फेडरेशन’च्या मते रशिया आणि अमेरिका हे जगातील सर्वांत मोठे अणूशक्ती देश आहेत. दोन्ही देशांकडे जगातील अंदाजे ८८ टक्के अण्वस्त्रे आहेत. यानंतर चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया यांचा क्रमांक लागतो.