सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी  उच्च न्यायालयाची  राज्य सरकारला नोटीस !

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण

परभणी – परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी कह्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा १६ डिसेंबर २०२४ या दिवशी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. प्रारंभी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते; परंतु सोमनाथ यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. सवातीन महिन्यांनंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण राज्य गुन्हे अन्वेषणाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली असून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर ८ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली. कुटुंबियांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. आता या प्रकरणात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे, तसेच पुढील सुनावणी २९ एप्रिल या दिवशी होणार आहे.

सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढतच रहाणार आहे’, असे सोमनाथ यांच्या आई आणि भाऊ यांनी म्हटले आहे.

सूर्यवंशी हत्या प्रकरणी न्यायदंडाधिकार्‍यांचा ४५१ पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला.