शालेय विभागाच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष ३० एप्रिलपर्यंत असते, म्हणजे प्रत्यक्ष शाळा या दिवसापर्यंत चालू असतात. १ मे या दिवशी वार्षिक निकाल लागतात आणि त्यानंतर १५ जूनपर्यंत शाळांना सुटी देतात. वर्षानुवर्षे ही पद्धत लागू होती; पण मागील काही वर्षांपासून शाळांनी यात मनमानी करत पालट केला. आता बहुतेक शाळा वार्षिक परीक्षा मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून चालू करतात. त्या परीक्षा एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात आटोपतात आणि शाळा बंद करतात. परिणामी ११ एप्रिलपासून ते १५ जूनपर्यंत शाळा बंद रहातात. अर्थात् २ महिने शिक्षक सुटी घेतात. वास्तविक शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जून ते एप्रिलपर्यंतचे शैक्षणिक शुल्क घेतात. याचा अर्थ शाळा एप्रिल महिन्याचे शुल्क विद्यार्थ्यांकडून लाटतात, असेच म्हणावे लागेल.
यंदा मात्र शाळांना धक्का बसला आहे. नेहमीप्रमाणे शाळांनी याही वर्षाचे वार्षिक परीक्षेचे नियोजन केले, ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा संपतील, असे आहे. याचा अर्थ अभ्यासक्रमही शिक्षक असाच पुढे रेटून संपवतात. अशातच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला आणि शाळांचे धाबे दणाणले आहेत. त्या शासन निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे, ‘राज्यभरातील सर्व शाळांच्या परीक्षा एकाच वेळी होतील, त्यासाठी प्रश्नपत्रिका शाळांना सरकार देईल. या परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चालू होतील. त्या २५ एप्रिलपर्यंत चालतील’, म्हणजे शाळा ३० एप्रिलपर्यंत चालू रहाणार आहेत. त्यानंतरच्या ५ दिवसांतच उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांना १ मेपर्यंत निकाल सिद्ध करावा लागणार आहे. याचा अर्थ शिक्षकांना पूर्वीप्रमाणे दीड महिना सुटी असणार आहे आणि शाळाही नियमाप्रमाणे एप्रिल महिन्यापर्यंत चालू रहाणार आहेत. अर्थात् हा पालट हळूहळू शाळा स्वीकारत आहेत. काही शाळांनी त्यांचे आधीचे परीक्षेचे वेळापत्रक पालटून आता शासनाच्या निर्णयानुसार केले आहे. तसा संदेश पालकांना पोचवला आहे; पण अजूनही काही शाळांनी त्यांच्या वेळापत्रकात पालट केल्याचे दिसत नसले, तरी त्यांना तो करावाच लागणार आहे.
शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करावे लागेल. यामुळे शाळा नियोजित वेळेच्या आधी महिनाभर बंद करून दोन महिने सुटी घेण्याची शिक्षकांची सवय बंद होईल. त्यासाठी अभ्यासक्रम उरकण्याच्या चुकीच्या सवयीलाही चाप बसेल. याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल. त्यांना रीतसर अभ्यास शिकवला जाईल आणि प्रश्नपत्रिका शासनाकडून येणार असल्याने शिक्षक त्यांचा ‘परफॉर्मन्स’ (कामगिरी) चांगला दिसावा; म्हणून सोप्या प्रश्न प्रश्नपत्रिका काढण्यालाही आळा बसेल !
– सौ. भक्ती भिसे, देवद, पनवेल