हिंदुत्व, धर्म, अध्यात्म, क्रांतीकारक आणि राष्ट्र यांवर प्रखर झंझावाती भाष्य करणारे व्याख्याते डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे !

विशेष सदर

डोंबिवली येथील डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे हे भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांचे (सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात वास्तव्य) ज्येष्ठ चिरंजीव आहेत. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी राष्ट्र, धर्म यांवर आधारित विविध पुस्तके लिहिण्यासह ते विविध विषयांवरील चर्चासत्रात सहभागी होत असतात. आज ते करत असलेले कार्य, त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांची कार्यप्रेरणा यांविषयी जाणून घेणार आहोत.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

१. शिक्षण : एम्.फील., पीएच्.डी.

२. जन्म : ९ नोव्हेंबर १९६१ (बलीप्रतिपदा)

३. आध्यात्मिक गुरु : ब्रह्मीभूत प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंत दा. आठवले)

४. विशेषता : व्याख्याते, प्रवचनकार, निरुपणकार आणि साहित्यिक असा दुर्मिळ असणारा संगम.

५. आजपर्यंत दिलेली व्याख्याने : रामायण, भागवत कथा, भगवान श्रीकृष्ण, मनोबोध, स्वामी विवेकानंद आदी अनेक विषयांवर प्रवचने, तर क्रांतीकारक, शिवरायांची युद्धनीती, पानिपतचा रणसंग्राम, काश्मीरनामा आदी अनेक विषयांवर व्याख्याने दिली.

या विषयांची मांडणी करतांना चित्रदर्शी शैलीत केल्याने श्रोत्यांच्या दृष्टीसमोर हुबेहूब चरित्र उभे करण्यात यश मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

व्याख्यान किंवा प्रवचन घेतांना होणारी स्थिती

व्याख्यान म्हणजे एक प्रखर झंझावातच ! कथानकाच्या रूपातून विषय फुलवत नेऊन मूळ गाभा उलगडून दाखवण्याची अजब हातोटी…स्पष्ट शब्दोच्चारांतून, बोलण्याच्या विशिष्ट ढंगातून आणि विचारांच्या ठाम मांडणीतून व्याख्यान एका वेगळ्याच उंचीवर नेण्याची करामत. त्यामुळे सहस्रावधी श्रोते अक्षरशः खिळून रहातात आणि विषयात रमून जातात. शब्दांच्या कोसळत्या धबधब्यात सचैल न्हाऊन निघतात.

प्रवचन करतांना मात्र अत्यंत शांतपणे संत साहित्याचे धागेदोरे उकलतांना दिसतात. संतांच्या चरित्राचे, उक्तीचे वा शिकवणुकीचे निरुपण अत्यंत रसाळ वाणीने होते. ज्या वेळी एखाद्या विषयाचा अभ्यास त्यावरील अनेक ग्रंथ सखोलतेने वाचून केला जातो, निरीक्षण-परीक्षण करून त्याचे सूक्ष्मपणे वैचारिकीकरण केले जाते, तेव्हा त्यावर प्रभुत्व मिळते आणि त्याला जर वक्तृत्वाचे कोंदण लाभले; तर व्याख्यान, प्रवचन बहारदार होणारच. अनेक संगीत कार्यक्रमात बहारदार आणि अर्थपूर्ण निरुपण.

व्याख्याने देण्याची अनोखी कामगिरी

डावीकडे डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि व्याख्यान देतांना डॉ. सच्चिदानंद यांचे सुपुत्र वैद्य परीक्षित शेवडे

आजवर गेल्या ३८ वर्षांत भारत आणि विदेशात मिळून एकूण ५ सहस्रांहून अधिक कार्यक्रम पार पडले अन् ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जहाज, विमान आणि बस यांमध्ये व्याख्याने देण्याची अनोखी कामगिरी पार पडली. सेल्युलर तुरुंगात व्याख्यान देणारा पहिलाच वक्ता… गेली १२ वर्षे सातत्याने तेथे ‘सावरकर स्मृतीदिनी’ व्याख्यान दिले. स्वित्झर्लंडमधील माऊंट टीटलीस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर बर्फात उभे राहून उपस्थितांना ‘शिवराय’ ऐकवले. इटलीतील व्हेनिस या तरंगत्या शहरातील सेंट मार्क स्क्वेअरवरून ‘स्वामी विवेकानंद’ सांगितले. दुबई, लंडन, मॉरिशस, सिडनी,  मेलबर्न , कोलंबो, नुवारा एलिया आदी ठिकाणी कार्यक्रम  पार पडले.

‘एबीपी माझा’, ‘जय महाराष्ट्र’, ‘मी मराठी’, ‘झी २४ तास’, ‘साम’, ‘सुदर्शन ’ आदी वृत्तवाहिन्यांवरील विविध विषयांवरील चर्चेत  नेहमी सहभाग घेतला.

साहित्याच्या सर्व क्षेत्रांत केलेले लेखन

अ. महानाट्य : क्रांतीचक्र (हिंदी)

आ. नाटक : चाणक्य-चंद्रगुप्त (सहलेखक : जनार्दन ओक)

इ. कादंबरी : रक्तलांच्छन, अघोरवाडा

ई. ललित चरित्रे : पुनरुत्थान (आद्यशंकराचार्य), नरेंद्र ते विवेकानंद, वासुदेव बळवंत, चापेकर पर्व, क्रांतीकारक राजगुरु (मराठी आणि हिंदी), ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज, भगवान परशुराम

उ. बालसाहित्य : गुरु आणि शिष्य (भाग १ आणि २)

ऊ. कुमार साहित्य : कथाबोध, कथाकुसुम, वासुदेव बळवंत फडके, खुदिराम बोस, मदनलाल धिंग्रा, सरदार उधमसिंग, भगतसिंग, यशाची गुरुकिल्ली

ए. ऐतिहासिक : काश्मीरनामा, वंद्य वंदेमातरम्, ….आणि सावरकर, शोध श्रीलंकेचा

ऐ. संकीर्ण : मुक्तवेध, निवडक मुक्तवेध, वाचा आणि गप्प बसा, राष्ट्रजागर, आता तरी जागे व्हा, डोळे उघडा, अवघे धरू सुपंथ, प्रहार, मुक्तवेध, सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स, सत्य सांगा ना..!, वाटा आपल्या संस्कृतीच्या.

ओ. धार्मिक : श्री चिंतामणी विजय कथासार, बाप्पा मोरया, मनाचिये द्वारी

औ. भावानुवाद : अद्भुत शक्तीचा खजिना, भारतीय यात्री, मिशन वैष्णोदेवी, इस्लामी आघातावर हिंदूंचा प्रत्याघात, डावी विषवल्लीअं. सहलेखन : श्री. दुर्गेश परुळकर यांच्यासह ‘शिवरायांची युद्धनीती’, ‘पानिपतचा रणसंग्राम’, ‘गोवा मुक्तीसंग्राम’, ‘सावरकर-ज्ञात आणि अज्ञात’; वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह ‘जमात ए पुरोगामी’, ‘राममंदिरच का ?’, ‘पाकिस्तान-विनाशाकडून विनाशाकडे’; तर भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग.शेवडे यांच्यासह ‘महाभारत- व्यासांचे व चोप्रांचे’ या पुस्तकांचे लिखाण केले.

क. ध्वनीचित्रतबकडी (सीडी) : समरगाथा, विजयगाथा

डॉ. शेवडे यांना मिळालेले पुरस्कार

‘सेल्युलर तुरुंगा’च्या पटांगणात व्याख्यान देतांना डॉ. सच्चिदानंद शेवडे

अ. ‘वंद्य वंदेमातरम्’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (‘म.सा.प.’चा) इतिहास विषयक ग्रंथलेखनाचा पुरस्कार

आ. ‘क्रांतीकारक राजगुरु’ या पुस्तकाला वंदना प्रकाशनाचा चरित्र ग्रंथाचा पुरस्कार

इ. ‘सेक्युलर्स  नव्हे फेक्युलर्स’, या पुस्तकाला उत्कृष्ट स्तंभलेखनाचा ‘म.सा.प.’ चा पुरस्कार

ई. पु.भा. भावे स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणार्‍या ‘पु.भा. भावे वक्तृत्व पुरस्कारा’ने सन्मानित, ‘रत्नागिरी कीर्तन कुला’कडून सन्मानपत्र अर्पण , ‘कल्याण-डोंबिवली महापौर पुरस्कार’ प्राप्त, ‘लोकमत’ समूहाने वर्ष २०१३ मध्ये ‘आयकॉन ऑफ ठाणे’ म्हणून सन्मानित केले. ‘उत्तुंग परिवार, विलेपार्ले ’च्या वतीने ‘स्वा. सावरकर राष्ट्रविचार प्रसारक पुरस्कार’ प्राप्त; जुलै २०१६ मध्ये ‘व्यास क्रिएशन्स, ठाणे’कडून ‘व्यासरत्न पुरस्कारा’ने सन्मानित; नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘मुंबई साहित्य संघा’च्या वतीने ‘संत व आध्यात्मिक लेखनासाठी पुरस्कारा’ने सन्मानित, वर्ष २०१८ मध्ये ‘टिळकनगर शिक्षण संस्था, डोंबिवली’च्या वतीने ‘सावरकर पुरस्कारा’ने सन्मानित;  वर्ष २०१९ मध्ये श्रद्धेय ‘अशोकजी सिंघल स्मृती राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त; ‘आम्ही सारे ब्राह्मण’ पाक्षिकाच्या वतीने ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार.

काही पुस्तकांची वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशने

अ. ‘…आणि सावरकर आणि प्रहार’ या पुस्तकांचे प्रकाशन अंदमानातील ‘सेल्युलर तुरुंगा’त केले .

आ. ‘वाचा आणि गप्प बसा’चे प्रकाशन ‘मॉरिशस’, तर ‘सावरकर-ज्ञात व अज्ञात’चे प्रकाशन लंडन येथील ‘तृतीय सावरकर विश्व संमेलना’त केले. ‘सत्य सांगा ना…!’चे प्रकाशन सिडनी येथे ‘चतुर्थ सावरकर विश्व संमेलना’त झाले.


हिंदुविरोधी वातावरणातही समाजजागृती करण्यासाठी मिळालेले स्फुरण

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

१. लेखन आणि व्याख्याने या क्षेत्राकडे वळण्यामागील प्रेरणा

माझे वडील पू. भागवताचार्य पू. (प्रा.) सुरेश शेवडे हे याच क्षेत्रात आहेत. त्यामुळे मी लहानपणापासून त्यांचे कार्यक्रम ऐकत आलो. आमच्या घरात धार्मिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवरील सहस्रो पुस्तके होती. त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याव्यतिरिक्त अवांतर वाचनही मोठ्या प्रमाणात झाले आणि विचारांचा पाया भक्कम झाला. महाविद्यालयीन काळात प.पू. स्वामी वरदानंद भारती यांची पुस्तके वाचली. त्यामुळे स्वत:चे मत ठामपणे मांडता येण्याचा संस्कार त्यांच्यावर झाला.

आजपासून ४४ वर्षांपूर्वी क्रांतीकारकांविषयी बोलणे, हे धक्कादायक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलणे दूरच, त्यांच्याविषयी ऐकणार्‍यांनाही भीती वाटत असे, एवढी भीती त्या वेळी समाजात होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलल्याने सरकार मला कारागृहात टाकेल’, असे काही लोक मला म्हणायचे. लोकशाही असल्याने सर्वांना आचार-विचार स्वातंत्र्य होते. त्यामुळे मी याची तमा बाळगली नाही; परंतु काँग्रेसने लोकांच्या मनात एक भीती निश्चितपणे निर्माण केली होती. भारताला केवळ काँग्रेसमुळेच स्वातंत्र्य मिळाले, हे शाळेत शिकवले जात होते. त्या शालेय जीवनात मी क्रांतीकारकांची चरित्रे वाचली. तेव्हा या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत, असे मला वाटले. या विचारातून समाजप्रबोधनाचा वसा मी चालू केला. जो आजतागायत चालू आहे.

२. प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाजप्रबोधन

४०-५० वर्षांपूर्वी आजच्यासारखी सामाजिक माध्यमे नव्हती. तेव्हा वृत्तपत्रे आणि मासिके होती. त्यातून ठराविक लोकांनाच प्रसिद्धी दिली जात होती. जे लोक सातत्याने लिहीत आले, सगळीकडे त्यांचीच प्रतिमा झळकत आली. या मोठ्या लोकांना समाज बुद्धीवादी समजत असे. तत्कालीन सरकारांनी त्यांना खिरापतीसारखे विविध पुरस्कार देऊन त्यांचे उदात्तीकरण केले. देवादिकांची टवाळी करणारा व्यक्ती मोठा समजला गेला. त्या काळात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मी समाजप्रबोधन केले.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे

हिंदुत्वाचे कार्य वाढवण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न

सध्या ‘राजकीय हिंदुत्व’ म्हणणारे वाढत आहेत. सत्तेतील हिंदुत्व हा भाग वाढायला लागला आहे. त्यामुळे नवहिंदुत्ववादी कुठेतरी एकत्र यायला लागले आहेत. त्यांना हिंदुत्वाशी काही देणे-घेणे नाही. आपण हिंदुत्वनिष्ठ होत चाललो आहोत म्हणजे काय ? आजही जातीभेदावरून माणसांची ओळख केली जाते आणि त्यांच्याविषयी पूर्वग्रह ठेवला जातो. याला ‘हिंदुत्ववाद’ म्हणत नाहीत. अशा परिस्थितीत सध्याच्या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाजात अभ्यासवर्ग आयोजित केले पाहिजेत. त्यातून कार्यकर्ते निर्माण होतील आणि ते समाजात जाऊन जनजागृती करतील. हे अभ्यासवर्ग ‘ऑनलाईन’ घेता येतील किंवा लहान लहान ‘रिल्स’ (छोट्या छोट्या ध्वनीचित्रफिती) करून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित करता येतील. – डॉ. सच्चिदानंद शेवडे