Sri Lanka Released Indian Fishermen : श्रीलंकेने ११ भारतीय मासेमारांना सोडले

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केले होते सूत्र

पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके

कोलंबो (श्रीलंका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौर्‍यावर असतांना त्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून मासेमारांच्या समस्येचे निराकरण करावे, असे वक्तव्य केले होते. पंतप्रधान मोदी दौरा संपवून भारतात परतण्यापूर्वीच श्रीलंकेने कारागृहात असलेल्या ११ भारतीय मासेमारांना सोडले.

१. पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्यात झालेल्या चर्चेत मासेमारांचे सूत्र प्रामुख्याने उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आम्ही मासेमारांच्या उपजीविकेशी संबंधित सूत्रांवरही चर्चा केली. आम्ही मासेमार आणि त्यांच्या नौका यांच्या तात्काळ सुटका करण्याचा आग्रह धरला.

२. मासेमारांच्या सूत्रावरून श्रीलंका आणि भारत यांच्यात नेहमीच वाद होतात. यापूर्वी अनेक वेळा श्रीलंकेच्या नौदलाकडून पाल्क सामुद्रधुनीत भारतीय मासेमारांवर बळाचा वापर केला जातो.