‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयी शंकानिरसन, ‘एर्गोनॉमिक्स’चे (ergonomics) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’ यांची माहिती सादर करणार आहोत. वाचक आणि जिज्ञासू यांना व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘वयाच्या ५० वर्षांनंतरच्या पुढील व्यक्तींनी नियमित व्यायाम केल्यास त्यांनाही उत्साह आणि उत्तम आरोग्य मिळवता येते’, यांविषयी जाणून घेऊया.
निरोगी जीवनासाठी व्यायाम – ५२
१. शारीरिक त्रासांमुळे उतारवयाचे भय वाटणे
‘सर्वांनाच उतारवयाचे भय वाटते; कारण ‘उतारवयामुळे जीवनाचा शेवट जवळ येत आहे’, याची जाणीव होते. उतारवयातील व्यक्तींना कुठल्याच गोष्टीची निश्चिती वाटत नाही. त्यांच्या पायांत, पाठीत, दातात, पोटात किंवा हृदयात दुखत असते आणि मनात दुःखच असते. या सर्वांत आणखी भर म्हणून शरिराला पडणार्या सुरकुत्या, सैल पडलेली कातडी, अशक्त स्नायू, वाकलेले गुडघे, मंद दृष्टी, बेढब झालेली मुद्रा, अरुची, तसेच शरिरातील अनेक अवयवांत होत असलेला ठणका, बहिरेपणा, थकवा इत्यादी व्याधींचा त्रास होतो. वृद्धावस्थेचे हे चित्र अत्यंत भेसूर आहे, हे खरे.
२. वृद्धांनी उत्तम आरोग्यासाठी शरिरातील स्नायू आणि अवयव यांमध्ये गती उत्पन्न होईल, एवढे चलन-वलन करणे आवश्यक !
बहुतेक सर्व वृद्धांना ‘निरामय जीवन जगावे आणि शक्य तर यौवनावस्थेतील आरोग्य प्राप्त व्हावे’, असे वाटते; पण त्यासाठी काहीतरी करावे लागते, हे मात्र कुणीही लक्षात घेत नाही. नुसते भरपूर सुग्रास जेवण केल्याने आपल्याला उल्हास मिळणार नाही, तसेच दुसर्याच्या उत्तम शरिराकडे पाहून आपल्याला उत्साह प्राप्त होणार नाही. जीवन म्हणजे चलन-वलन होय. आपल्या वैयक्तिक आवश्यकतेप्रमाणे शरिरातील स्नायू आणि अवयव यांमध्ये गती उत्पन्न होईल, एवढे चलन-वलन करणे आवश्यक आहे अन् तसे केले, तरच आपल्याला उत्साह वाटेल.
३. वयस्कर माणसांनी आळस झटकून कार्यरत रहावे !
सामान्यतः ‘वयस्कर माणसे बहुधा आळसाचा आश्रय करून शारीरिक श्रम टाळतात’, असे अनुभवायला येते; पण अशा माणसांनी आळस झटकून काहीतरी हालचाल करण्याचा निश्चय करायला हवा. जे लोक पुष्कळ वेळ आळसात घालवतात, त्यांना परिश्रम करता येत नाही. ज्यांनी साधा व्यायाम केला आहे, त्यांना उतारवयात अधिक ताणाचे व्यायाम करणे जड जाते. तथापि ‘मनुष्य जेव्हा मध्यम वयाला (४५ ते ६४ वर्षे वयाच्या दरम्यान) पोचतो, तेव्हा त्याला ‘आपण काय करायला हवे ?’, याचे भान होते; पण तसे आचरण त्याला करता येत नाही. त्याला कुणीतरी जागृत करण्याची आवश्यकता असते. त्याला शारीरिक दुर्बलतेच्या मोहातून बाहेर काढले पाहिजे; कारण तो जितका अकार्यक्षम राहील, तितकी त्याच्यातील आळसात वाढ होईल.
४. वृद्धांनी निरोगी, उत्साही, शक्तीमान आणि दीर्घजीवी होण्याचा निश्चय करावा !
ज्यांच्यातील उत्साह अगदी अल्प झाला आहे, त्यांना वृद्धावस्थेचे फार भय वाटते. ज्यांचे स्नायू काम देत नाहीत, त्यांना ‘आपले हृदय केव्हा बंद पडेल ?’, याची नेहमी भीती वाटते; म्हणून भीती टाकून ‘आपण निरोगी, उत्साही, शक्तीमान आणि दीर्घजीवी होऊ’, असा निश्चय करायला हवा. ‘माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे’, असे दिसून येते. आपण स्वतःच प्रयत्नपूर्वक खरोखरीची कार्यक्षमता मिळवल्याविना आपल्याला लाभलेले दीर्घायुष्य, म्हणजे म्हातारपण अधिक दु:खमयच होय !
५. योग्य व्यायाम केल्यामुळे वयस्कर माणसांनाही उत्साह, शक्ती, बळकट स्नायू इत्यादी गोष्टी त्वरित अन् निश्चयपूर्वक प्राप्त करून घेता येणे शक्य !
वयाची पन्नाशी किंवा साठी उलटलेल्या माणसांनाही उत्साह, शक्ती, बळकट स्नायू इत्यादी गोष्टी त्वरित आणि निश्चयपूर्वक प्राप्त करून घेता येतात. ही गोष्ट अनुभवाने सिद्ध झाली आहे. साठीच्या पुढील वयाच्या माणसांनी व्यायाम केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचे स्नायू बलवान झाले असून त्यांच्या कार्यक्षमतेत भरच पडली आहे. याचा अर्थ असा नव्हे की, वयस्कर मंडळीनी एकदम पुष्कळ परिश्रम करण्यास आरंभ करावा. तुम्ही कधीच व्यायाम केला नसेल, तर एकदम पुष्कळ परिश्रम असलेला व्यायाम करणे अपायकारक होईल. तुम्ही कितीही अशक्त असलात, तरीही अल्प श्रम असलेल्या व्यायामापासून आरंभ करून हळूहळू व्यायाम वाढवा. याप्रमाणे केल्यास ‘तुमची शक्ती वाढत आहे आणि तुमच्या उपेक्षित शरिराला आकार येत आहे’, असे आढळून येईल. तुम्ही पूर्वी जे केले होते, ते तुम्हाला पुन्हा करता येईल, म्हणजे शरिरात सुधारणा होईल. हे सर्व अनुभवसिद्ध सत्य आहे. वृद्धावस्थाही अधिक प्रमाणात मानसिक अवस्थाच आहे आणि आपल्यात सुधारणा करण्याच्या या नवीन छंदामुळे प्राप्त झालेल्या उत्साहामुळे आपल्याला कार्याची नवीन दालने उघडी होतील.
६. निरोगी आणि आनंदी जीवनासाठी वेळ काढून व्यायाम करणे आवश्यक !
‘निरामय जीवन’ हा एक वर समजण्यापेक्षा तो ‘एक हक्क’ समजला पाहिजे. प्रतिदिन १० ते १५ मिनिटे व्यायामासाठी व्यय केली, तर त्यात आपली काय हानी आहे ? एखादी सिगारेट सावकाश फुंकत बसण्यातही तुमचा इतका वेळ सहज जातो, तसेच तुम्ही प्रथम चालू केलेला व्यायाम करण्यात कित्येक आठवडे गेले, तर त्यामुळे तुमचा उत्साह आणि कार्यक्षमता यांमध्ये भरच पडल्याचे आढळून येईल अन् व्यायाम करायला उत्तेजनच मिळेल.
७. सुप्रसिद्ध मल्ल लीडरमन यांचे अनुभवसिद्ध बोल !
वरील विचार सुप्रसिद्ध मल्ल लीडरमन यांचे आहेत. त्यांचे स्वतःचे वय ६० वर्षांच्या पुढे आहे, तरीही त्यांचे शरीर सुदृढ आणि कार्यक्षम आहे. ते स्वानुभवाने आणि अधिकारवाणीने सांगतात, ‘‘वर जो उपदेश केला आहे, तो आचरणात आणा. त्याबद्दल संशय ठेवू नका. मी स्वतः व्यायामाने होणारे आश्चर्यकारक पालट पाहिले आहेत. फार कशाला, ‘माझे स्वतःचे शरीर’ हाच याचा उत्कृष्ट पुरावा आहे.’’
– श्री. शं. धों. विद्वांस, संपादक, मासिक ‘व्यायाम’ (साभार : अर्ल लीडरमन यांचा ‘फिजिकल कल्चर’ या विषयावरील लेख, ऑगस्ट १९४७)