History Needs To Be Rewritten : देशातील नागरिकांसमोर सत्य मांडण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन आवश्यक !

हिंदु विधीज्ञ परिषदेने एन्.सी.ई.आर्.टी’ला पत्र लिहून केली मागणी !

ठाणे – अत्याचारी इस्लामी आक्रमणकर्त्यांना ‘चांगले’ आणि ‘कार्यक्षम’ राजे म्हणून चित्रित करणारे अन् देशातील मूळ लोकांमध्ये (हिंदूंमध्ये) ‘दुय्यम नागरिक’ म्हणून भावना निर्माण करणारे इतिहासाचे एकतर्फी चित्रण तातडीने पालटण्यात यावे. यासमवेत देशातील नागरिकांसमोर सत्य मांडण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने केली आहे. परिषदेने ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी)’च्या संचालकांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात ही मागणी केली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली.

१. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या काही सदस्यांनी ‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली इतिहासाची काही पाठ्यपुस्तके अभ्यासली असता यांमध्ये भारतीय नागरिकांच्या दृष्टीकोनातून इतिहासाचे योग्य चित्रण केलेले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये इस्लामी आक्रमणकर्त्यांनी केलेले अमानवी नि पाशवी अत्याचार लपवण्याचा एक कमकुवत प्रयत्न केला गेला आहे. त्यांना या प्रांताचे ‘कार्यक्षम प्रशासक आणि शासक’ म्हणून दाखवले गेले आहे.

२. महत्त्वाचे म्हणजे इतिहासाच्या पुस्तकांत या इस्लामी रानटी राज्यकर्त्यांनी  हिंदुस्थानातील स्थानिक लोकांवर लादलेल्या धार्मिक धर्मांधतेचा कुठेच उल्लेख नाही. सत्तेसाठी इस्लामी राज्यकर्त्यांनी स्वत:च्या वडिलांची हत्या करणे किंवा त्यांना कारागृहात डांबणे, स्वत:च्या भावांची निर्घृणपणे हत्या करणे आणि बलपूर्वक स्वतःला सम्राट म्हणून नियुक्त करणे यांविषयी कुठलाच उल्लेख या पुस्तकांत नाही.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

३. या पाठ्यपुस्तकांत इतिहासाच्या चुकीच्या वर्णनाची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत :

अ. इयत्ता ७ वीच्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात ‘संरक्षित लोकां’च्या खोट्या कथानकांचे वर्णन केले आहे. याच पाठ्यपुस्तकात चंगेज खान आणि तैमूर यांना ‘महान असे संबोधले आहे. ‘मुघल हे दोन महान राजवंशांचे वंशज होते’- त्यांच्या आईच्या बाजूने चंगेज खानचे वंशज होते, तर वडिलांच्या बाजूने ते तैमूरचे उत्तराधिकारी होते. एखाद्या भारतियाने चंगेज खान आणि तैमूर यांना ‘महान’ म्हणून कोणत्या अर्थाने घोषित करण्याची आवश्यकता आहे ?

आ. छत्रपती शिवाजी महाराजांचे अयोग्य चित्रण या पुस्तकातील आठव्या अध्यायात करण्यात आले आहे. हा अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतो; पण अगदी अनौपचारिकपणे. या अध्यायात मुघलांच्या अत्याचारांविषयी किंवा स्वदेशी लोकांवर लादलेल्या इस्लामी विकृतींविषयी काहीही नाही.

इ. अशा प्रकारे या पुस्तकात इतिहासाचे सत्य चित्रण करण्याऐवजी मुघल आणि पूर्वीचे इस्लामी राज्यकर्ते (सर्व रानटी) धर्मनिरपेक्ष आणि पराक्रमी होते, असे खोटे चित्रण करण्यात आले आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेने एन्.सी.ई.आर्.टी’ला लिहिलेले पत्र –

४. इतिहासाविषयीची ही खोटी माहिती पालटण्यासाठी ‘एन्.सी.ई.आर्.टी’ने आवश्यक पावले उचलावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने केली आहे.

संपादकीय भूमिका

गेल्या साडेदहा वर्षांपासून केंद्रात हिंदुत्वनिष्ठ भाजपची सत्ता असतांना ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ आखण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले; परंतु आता त्यापुढे जाऊन आक्रमकांचा उदोउदो करणारा इतिहास पुसून हिंदु राजांच्या शौर्याचे धडे तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या या मागणीनिमित्त तिचे अभिनंदन ! हिंदु समाजाने या मागणीला व्यापक समर्थन देणे आवश्यक !