जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

कार्यक्रमापूर्वी विधी करतांना श्री. चेतन राजहंस, जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, भाजपचे दामोदर नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, पुरोहित आणि अन्य

जुने गोवे – श्री संप्रदायाच्या जुने गोवे (बायंगीणी) उपपिठातील एका कार्यक्रमात धर्मांतरित ११५ जणांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा १४ जुलै या दिवशी पार पडला. सर्वांना वैदिक मंत्रोच्चारात आणि धार्मिक वातावरणात हिंदु धर्मात सन्मानपूर्वक अन् विधीवत पुनर्प्रवेश देण्यात आला. हे सर्व जण परधर्मीय धर्मप्रचारकांच्या आमिषांना आणि भूलथापांना भुलून मूळ सनातन हिंदु धर्मापासून दूर गेले होते. या बांधवांनी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित होऊन स्वेच्छेने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले, ‘‘चुकीचे मार्गदर्शन करून आणि विविध आमिषे दाखवून या सर्वांना त्यांच्या मूळ धर्मापासून दूर नेण्यात आले होते. आज त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ सनातन धर्मात सन्मानाने स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या पारंपरिक उपासना पद्धतीचे पुनर्स्थापन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेला प्रत्येक बांधव स्वेच्छेने आणि आनंदाने हिंदु धर्मात परत आला आहे.’’

जुने गोवे येथे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणारे ११५ धर्मांतरित बांधव

कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभेच्छा !

या कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक आणि आमदार प्रेमेंद्र शेट, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी या माध्यमातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

आतापर्यंत १ लाख ५६ सहस्र १२९ जणांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

यापूर्वी १४ फेब्रुवारी या दिवशी याच उपपिठात ३०० बांधवांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला होता. आजच्या कार्यक्रमानंतर जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात राबवण्यात येणार्‍या या धर्मकार्यातून आतापर्यंत १ लाख ५६ सहस्र १२९ जणांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे.

सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवला पाहिजे !

या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले, ‘‘हा कार्यक्रम धर्मांतराचा नाही; कारण धर्मांतरित मूळ हिंदु धर्मातलाच होता. त्याचे नाव, जात काहीही पालटणार नाही. धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी आहेत. ते आदिवासी भागांत जाऊन त्यांचे धर्मांतर करतात. त्यांची जात पालटत नाहीत. सर्व सरकारी योजना त्यांना घ्यायला लावतात. आम्ही या लोकांना कोणतीही प्रलोभने दाखवलेली नाहीत. भगवान श्री रामानंदाचार्य यांनी हे काम १३ व्या-१४ व्या शतकात केलेले आहे. आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते कृतीत आणले आणि धर्मांतर केलेले नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवला पाहिजे.’’