आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ प्रशासन दरवाढीचा निर्णय घेणार !

पुणे – आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी.एल्. ‘पी.एम्.पी.एम्’ (पुणे महानगर परिवहन महामंडळ) प्रशासन दरवाढीसह अन्य महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. त्यात प्रवासाचे टप्पे अल्प करणे, कर्मचार्‍यांची भरती न करणे आदींचा समावेश आहे. तिकीट दरवाढीला विरोध होऊ शकतो, त्यामुळे ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ने गुप्तता पाळली आहे. ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’च्या संचलनातील तूट ७६६ कोटी झाल्याने प्रशासनाने तिकीट दरवाढीसंदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अद्याप दरवाढीचा प्रस्ताव नसला, तरीही प्रशासन संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करणार आहे. तिकीट दरवाढ झाल्यास प्रवासी आणि संघटना यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. गेल्या ८ वर्षांपासून तिकीट दरवाढ झाली नसल्याने उत्पन्नवाढीसाठी दरवाढ करावी लागणार आहे.

सद्यःस्थितीत ८ सहस्र ५०० कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनावर महिन्याला ४८ कोटी रुपयांचा खर्च होतो. ही रक्कम जास्त असल्याने प्रशासनाने कर्मचार्‍यांची भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत नवीन बस दाखल होतील. यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक आणि वाहक यांना घेणार आहेत. त्यामुळे वेतनावर होणार्‍या खर्चात बचत होईल.