आज ‘छावा’ हा हिंदी चित्रपट पाहिला. या चित्रपटाचा संदेश एकच आहे, ‘आपल्या पूर्वजांनी मृत्यू पत्करला; पण धर्म सोडला नाही.’ म्हणूनच आज आपण आपले सण साजरे करू शकतो, कुंभमेळ्यासारख्या आपल्या परंपरा साजर्या करू शकतो, आपल्या सर्वसमावेशक आणि सहिष्णू धर्माचे पालन करू शकतो.
महंमद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लामच्या प्रचारासाठी ज्या मोहिमा चालू झाल्या त्यात सीरिया- पॅलेस्टाईनवर ८ वर्षांत, इजिप्तवर ४ वर्षांत, इराकवर २ वर्षांत, इराणवर ८ वर्षांत, संपूर्ण उत्तर आफ्रिकेवर ५० वर्षांत, संपूर्ण मध्य आशियावर १०० वर्षांत, स्पेनवर ४ वर्षांत इस्लामचा झेंडा फडकू लागला. या सगळ्या मोहिमा एकाच वेळी झाल्यामुळे अवघ्या १२५ वर्षांत पूर्वेला अफगाणिस्तानपासून पश्चिमेला स्पेनपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात इस्लाम प्रस्थापित झाला. ही १२५ वर्षे धरून एकूण २५० वर्षांत या प्रदेशातील प्रत्येक व्यक्तीला इस्लाम धर्म आणि अरबी भाषेचा स्वीकार करावा लागला.

भारतियांनी परकीय आक्रमकांशी केलेल्या कडव्या संघर्षामुळे भारतावर इस्लामी झेंडा फडकू न शकणे
बायझेंटाईन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य यांसारखी सहस्रो वर्षांपासून अस्तित्वात असलेली शक्तीशाली साम्राज्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडत होती. असे असतांना कुठलीही शक्तीशाली केंद्रीय सत्ता नसलेल्या भारतात मात्र ११०० वर्षे प्रयत्न करूनही इस्लामला संपूर्ण देशावर स्वतःचा झेंडा फडकावता आला नाही, तसेच भारतियांचा धर्म आणि भाषा यांचे उच्चाटन करता आले नाही. याचे कारण ‘भारतात आल्यानंतर हे धर्मांध आक्रमक अचानक सहिष्णू झाले’, हे नसून ‘भारताने त्यांच्याशी सतत कडवा संघर्ष केला’, हे आहे. महंमद इक्बालसारख्या अनेकांनी इस्लामला भारतात आलेल्या या अपयशाविषयी खंत व्यक्त केली आहे. आपल्याला मात्र हेच सांगण्यात आले की, भारताचा इतिहास हा पराभवांचा आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे बलीदान हा या संघर्षाचाच एक गौरवशाली अध्याय आहे. त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन ! देव, देश आणि धर्म यांसाठी बलीदान देणार्या या विरांसाठी भारत कृतज्ञ आहे !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२५.२.२०२५)