मुळगाव येथील प्राचीन रामनाथ मंदिरात यंदा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याचा मुळगावच्या ग्रामस्थांचा निर्णय

डिचोली, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – गावकरवाडा, मुळगाव येथील प्राचीन रामनाथ मंदिरात यंदा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याचा निर्णय मुळगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या खाण व्यवसायामुळे हे मंदिर दुर्लक्षित झाले होते.

याविषयी येथील स्थानिक नागरिक नरेश परब म्हणाले, ‘‘यावर्षी महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने या मंदिराला उर्जितावस्था आणण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. निसर्गाने नटलेल्या भागात हे मंदिर असून त्याला सहस्रो वर्षांचा इतिहास आहे. मंदिराच्या समोर रामनाथ तलाव असून त्यामध्ये सर्व १२ महिने पाणी असून ते मुळगावचे सांस्कृतिक आणि धार्मिक प्रतीक आहे.’’

मुळगावपासून जवळ असलेल्या लामगाव येथील बौद्ध गुहा आणि दगडात कोरलेले ३ फुटांचे शिवलिंग मुळगाव येथील सांस्कृतिक वारसा दर्शवतात. स्थानिक लोकांच्या मते रामनाथ तळ्यात असलेल्या बारमाही पाण्यामुळे बौद्ध भिक्षू या भागात स्थायिक झाले असावेत. या मंदिराचे अध्यक्ष कृष्णा परब म्हणाले, ‘‘२५ वर्षांपूर्वी पाण्याने समृद्ध असलेला हा भाग खाणीसाठी खोल खड्डे खणल्याने आता कोरडा झाला आहे. काही वर्षांपूर्वी या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी खाण आस्थापनाने रक्षक ठेवला होता. त्यानंतर गावातील लोकांनी हळूहळू या मंदिरात जाणे बंद केले होते. त्यामुळे खाणीच्या अवशेषांमध्ये असलेल्या या मंदिराभोवती झुडपे वाढली आहेत. त्यामुळे यंदा शिवरात्रीला या प्राचीन लिंगाची पूजा करून आम्ही शिवरात्री साजरी करणार आहोत.’’ आता गावातील युवकांनी मंदिराभोवतीचा परिसर आणि तिथे जाणारा रस्ता स्वच्छ करायला प्रारंभ केला आहे.