(म्हणे) ‘विशिष्ट धर्माला समोर ठेवून अभ्यासक्रम राबवणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेला छेद देणे होय !’ – शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयासाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालू करण्यावर होत आहे टीका!

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. ६ महिने मुदतीच्या या अभ्यासक्रमातून व्यावसायिक पद्धतीने मंदिर व्यवस्थापनासाठीची कौशल्ये, मंदिर व्यवस्थापनाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू या विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून विद्यापिठाच्या नाशिक संकुलात, तर पुणे येथे जूनपासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश चालू करण्यात येणार आहेत. ‘१४० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारत देशात १२१ भाषा, २७० बोलीभाषा, ४६१ जमाती आणि अनेक धर्म अन् पंथ अस्तित्वात आहेत. असे असतांना विशिष्ट धर्माला समोर ठेवून अभ्यासक्रम राबवणे म्हणजे राज्यघटनेच्या सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता या आशयाला छेद देणे होय’, अशा शब्दांत विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयावर शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी टीकास्त्र सोडले आहे. (धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान दिले जाते याविषयी हे सर्वधर्मसमभाववाले मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

१. विद्यापिठाने मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी ‘टेम्पल कनेक्ट’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे; मात्र धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम विद्यापिठाचे आहे का ? त्यासाठी विविध धर्माच्या संस्था कार्यरत आहेत. ‘असा अभ्यासक्रम विद्यापिठात शिकवून तरुणांना पूजापाठ करूनच नोकर्‍या मिळणार आहेत’, असे सरकारला वाटते. हा अत्यंत हास्यास्पद आणि निंदनीय प्रकार आहे, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (जर मुसलमानांना कुराण शिकवणारे मदरसे आणि ख्रिस्त्यांना बायबल शिकवणार्‍या कॉन्व्हेंट शाळा चालवण्याचा अधिकार असेल, तर हिंदु संस्कृती, मंदिर व्यवस्थापन, वेद, उपनिषदे शिकवण्यास विरोध का ? धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा दुटप्पीपणा कशासाठी ? – संपादक)

२. महापेरेंट्स पालक संघटनेचे अध्यक्ष दिलीपसिंह विश्‍वकर्मा म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या या एकतर्फी निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्माशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम आला की, हे तथाकथित सर्वधर्मसमभाववाले ‘धर्मनिरपेक्षतेला धोका’ असल्याची आवई उठवतात; पण त्याच लोकांना मदरशांमध्ये इस्लामी शिक्षण किंवा ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांमध्ये बायबल शिकवले जाणे धर्मनिरपेक्षतेला बाधा आणणारे वाटत नाही, हे दुर्दैवी आहे.
  • हिंदूंंच्या परंपरा, अध्यात्म आणि व्यवस्थापन कौशल्य शिकवले जाणे त्यांना ‘राज्यघटनेला घातक’ वाटते; मग इतर धर्मांचे शिक्षण ‘घटनासंमत’ कसे ?
  • धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदु धर्मावरच आक्षेप का ?