परिचयडॉ. सुरेश भोसले हे कराड येथील कृष्णा विश्व विद्यापिठाचे कुलगुरु आहेत. डॉ. भोसले नामांकित शल्यचिकित्सक असून मिरज मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कराड येथे वर्ष १९९५ पासून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स महाविद्यालयाच्या माध्यमातून कार्य चालू केले. विभाग प्रमुखापासून ते कुलपती पदापर्यंत अनेक उत्तरदायित्व त्यांनी सांभाळले आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. वर्ष १९९९ पासून ते कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. वर्ष २००३ मध्ये त्यांनी शेतकी महाविद्यालय चालू केले. कृष्णा सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. |

सातारा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील रा.ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्ट आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने प्रतिवर्षी ‘सातारा भूषण’ पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०२४ चा ३४ वा‘ सातारा भूषण’ पुरस्कार कराड येथील डॉ. सुरेश भोसले यांना देण्यात येणार आहे. कला, क्रीडा, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रांत काम करणार्या आणि आपल्या उत्तुंग यशाने सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणार्या व्यक्ती आणि संस्था यांना हा पुरस्कार वर्ष १९९१ पासून दिला जात आहे.
आतापर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, छोटा गंधर्व, सयाजी शिंदे, राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले, ह.भ.प. बाबा महाराज सातारकर, यमुनाबाई वाईकर, फारूक कुपर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रताप गंगावणे, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. रणजीत जगताप यांना ‘सातारा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.