प्रयागराज कुंभपर्व २०२५
|
प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील ‘कला कुंभ’ प्रदर्शनात कुंभमेळ्याच्या इतिहासाविषयी शासकीय पुराव्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात अनेक पुराव्यांमध्ये असे सिद्ध होते की, ब्रिटिशांनी एके काळी कुंभमेळ्याला विरोध केला अन् त्यानंतर कुंभमेळ्यातही भाविकांवर कर लादून पैसे लाटले. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट देऊन पुराव्यांचा अभ्यास केला. त्यातून अनेक खळबळजनक गोष्टी लक्षात आल्या.

१. कुंभमेळ्याची सोय चांगली केली; म्हणून लियाकत हुसेन नावाच्या अधिकार्याला अनेक बढती मिळाल्या, वेतनवाढ झाली. प्रत्यक्षात अनेक कुंभमेळ्यांमध्ये दुर्दैवी घटना घडल्याचा उल्लेखही अनेक शासकीय पत्रांतून सापडतो. (यातून असे लक्षात येते की, हिंदूंकडून अधिकाधिक करवसुली करणार्या अधिकार्याला पदोन्नती आणि वेतन वाढ देण्यात आली ! – संपादक)

२. वर्ष १८८२ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात लावलेल्या करांमधून ब्रिटीश सरकारला ४९ सहस्र ८४० रुपये इतका लाभ झाला. संबंधित पत्रात असेही म्हटले आहे की, हा लाभ एका वर्षाच्या उत्पन्नाच्या दुप्पट होता.
३. ब्रिटीश सरकारी अधिकार्याने वर्ष १८८८ मधील कुंभमेळ्यात एका नागा साधूंच्या मिरवणुकीला स्वतः उपस्थित राहून संरक्षण दिले होते. त्याविषयी कुत्सितपणे लिहित तत्कालीन ‘मख्सान ए मसीही’ नावाच्या वृत्तपत्राने ‘ब्रिटीश अधिकार्याने उघडपणे नग्न फकिरांच्या (नागा साधूंच्या) एका मिरवणुकीला संरक्षण दिले जो अतिशय महत्त्वपूर्ण पदावर होता. यातून या वृत्तपत्राने ‘ब्रिटीश सरकार हिंदु धर्माला साहाय्य करते का ?’ असा असंबंद्ध प्रश्न विचारला. याच लेखाचा संदर्भ घेत ‘ख्रिश्चन ब्रदरहूड’ संस्थेच्या संचालकाने लिव्हरपूलमधील तत्कालीन आमदाराला पत्र लिहले की, ‘ब्रिटिशांचा भारतात येण्याचा मूळ उद्देश असे मेळे रोखणे हा होता. याउलट अधिकार्याने मेळ्याला संरक्षण दिले ही गोष्ट ख्रिस्ती पंथाला लाजिरवाणी आहे. एक ख्रिस्ती सरकार भारतात असून अशा गोष्टी घडत आहेत.’

४. काही पत्रांतून ‘तत्कालीन कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या करांपासून मिळालेले उत्पन्न आणि एकूण खर्चानंतर उरलेली रक्कम ही १८ सहस्र इतकी होती. (यातून असे लक्षात येते की, ब्रिटिशांनी केवळ कुंभमेळ्यातून भारताची इतकी संपत्ती कररूपाने लुटली ! आज ही कागदपत्रे उपलब्ध असल्याने काही वर्षांच्या कुंभमेळ्यांची आकडेवारी आपल्याला मिळते. अशा अनेक कुंभमेळ्यांतून ब्रिटीश, मोगल आक्रमक आणि अन्य पातशाह्यांनी भारताच्या संपत्तीला कसे लुटले असेल ? याची थोडी कल्पना येते ! – संपादक)