Vishwa Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविना होऊ शकत नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे येथे तिसर्‍या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वातंत्र्यवीर सावरकर

पुणे, ३१ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविना मराठीचा विचार आपण करूच शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीसाठी जी माया दिली, जो शब्दकोष दिला, जो शब्दांचा खजिना दिला, ते मराठीचे सौंदर्य आहे. या साहित्य संमेलनाविषयी अनेकांनी वाद निर्माण केले. वाद, प्रतिवाद झालाच पाहिजे. मराठी माणसाला कलह करायला आवडतो. त्यातून वैचारिक मंथन होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या तिसर्‍या ‘विश्‍व मराठी संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात हे संमेलन होणार आहे.

ते म्हणाले…,

१. आज सर्वत्र कृत्रिम बुद्धीमत्तेचा बोलबाला आहे. त्याचा वापर करून मराठीचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. एआयच्या युगात आपण जर ‘स्मॉल लँग्वेज मॉडल’मध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य घातले, तर येणार्‍या पिढीला साहित्यिकांनी काय केले, ते समजेल.

२. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याची मराठी भाषा प्रमाण मानली जाते. मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ (राजमान्यता) मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही मराठीचे कार्यकर्ते म्हणून कार्य करतो. आम्ही भाषेचे कार्यकर्ते आहोत. मराठी माणूस कुठेही असला, तरी तो दुधात साखरेसारखे काम करतो.’’ उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘मराठी भाषा आता महाराष्ट्र सीमेपुरती राहिलेली नाही. ती जगभर आहे. मराठी माणूस हा कधीही संकटाला घाबरणारा नाही. सरकार म्हणून कर्नाटकातील, तसेच देहलीतील मराठी शाळांना आर्थिक साहाय्य करत आहोत.’’

वैशिष्ट्यपूर्ण

१. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक (वय ९३ वर्षे) यांना पहिला ‘साहित्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

२. जगातील २५ देशांतील मराठीप्रेमी लोक संमेलनाला आले होते.

३. जगातील २५ देशांमध्ये मराठीची २५ बृन्हमंडळे स्थापन झालेली आहेत.

४. येत्या ५ वर्षांमध्ये हेच मराठी साहित्य संमेलन परदेशामध्ये घेऊ. परदेशामध्येही मराठीचा डंका वाजवू, असा निर्धार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ भेट !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ग्रंथ भेट देतांना सनातनचे साधक

साहित्य संमेलनाच्या ठिकाणी मराठी भाषेतील विविध विषयांवरील ग्रंथ, तसेच पुस्तके यांच्या विक्रीची दुकाने लावण्यात आली आहेत. सनातन संस्थेकडून धर्म, अध्यात्म, साधना आणि हिंदु राष्ट्र यांविषयी विविध ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या वेळी येथील प्रदर्शन दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनातन संस्थेच्या वतीने ‘सण साजरे करण्याच्या पद्धती’, ‘धर्मशिक्षण फलक’ आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हे ३ ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.