हरिद्वार येथील ‘गंगा आरती’प्रमाणे गोव्यात नार्वे येथे ‘घाट आरती’

गोवा सरकारचा उत्तराखंड सरकारशी करार

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी – गोव्यातील पर्यटन खात्याने गोव्यात येणार्‍या पर्यटकांना आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. उत्तराखंडमधील हरिद्वार, ऋषिकेश, तसेच उत्तरप्रदेशमधील प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी आदी तीर्थक्षेत्रांत होणार्‍या ‘गंगा आरती’प्रमाणे गोव्यात नार्वे येथे ‘घाट आरती’ला प्रारंभ करण्याचे ठरवले आहे. यासाठी गोवा सरकारने उत्तराखंड सरकारशी सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती गोव्याचे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘याद्वारे उत्तर काशीला (वाराणसीला) दक्षिण काशीशी (गोव्याशी) जोडण्याचा पर्यटन खात्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर पर्यटन खाते पर्वरी येथे एक पर्यटक सभागृह उभारणार आहे. हे सभागृह मार्च २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे.’’