‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवसा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन !

देशभरातून १ सहस्र ‘स्टार्टअप्स’चा सहभाग

मुंबई – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने ‘एम्पॉवरिंग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘जिओ वर्ल्ड सेंटर’मध्ये १६ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता चालू होणार्‍या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण, तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १ सहस्र स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कौशल्य विकासमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले की, दिवसभरात होणार्‍या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणूकदारांच्या आवश्यकता आणि युवा उद्योजकांच्या यशकथा यांवर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ दिन घोषित केला आहे.

‘एक दिवसाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.