ग्राहकराजा, जागा हो ! 

संपूर्ण विश्व इंधनावर चालते. भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. देशात विविध आस्थापनांचे सहस्रो पेट्रोलपंप आहेत. देशाच्या दळणवळणामध्ये इंधन हा अविभाज्य घटक असून वाहनांचाही तितकाच सहभाग आहे. वाहनाला जसे इंधन लागते, तसेच चाकांमध्ये हवासुद्धा आवश्यक असते. लांबच्या प्रवासाला निघतांना आपण वाहनांमध्ये इंधन भरतो. चाकांमध्ये हवा आहे कि नाही ?, याचीही पडताळणी करतो. आवश्यक असेल, तर हवा भरतो; मात्र पेट्रोल पंपावर हवा भरल्याचे वेगळे पैसे पेट्रोल पंपचालकाला द्यायची आवश्यकता नसतांनाही ते द्यावे लागतात. जगात केवळ ‘हवा आणि पाणी हेच विनामूल्य आहे’, असे म्हटले जाते; मात्र तरीही काही ठिकाणी पाण्यावर कर आकारला जातो.  आता हवासुद्धा विकत घ्यावी लागत आहे, हे अयोग्य नव्हे का ?

भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देशातील सर्वच पेट्रोल पंपचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत की, ग्राहकांना पेट्रोल पंपावर हवा, पाणी आणि स्वच्छतागृहे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावीत. ही ग्राहकांची मूलभूत आवश्यकता असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये; मात्र याविषयी ग्राहकांना अंधारात ठेवून अनेक पेट्रोल पंपचालकांकडून वाहनांमध्ये हवा भरल्यावर ५ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते, तसेच पेट्रोल पंपांवर असलेली स्वच्छतागृहे कुलूप लावून बंद ठेवली जातात. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. ग्राहकांना स्वतःच्या मूलभूत हक्कांची माहिती नसल्यामुळे त्यांची विविध स्तरांवर कुचंबणा होते. विनाकारण वाद घालायला नको; म्हणून ग्राहक पेट्रोल पंपावर पैसे देऊन वाहनांमध्ये हवा भरून घेतो; मात्र याला विरोध करण्यासाठी कोणत्याही सामाजिक संघटना पुढे येत नाहीत. साधी हवा, हायड्रोजन हवा, नायट्रोजन हवा अशा गोंधळात ग्राहक भुलून जातो. वाहनांमध्ये केवळ हवा भरण्याच्या माध्यमातून पेट्रोल पंपचालकाकडून प्रतिवर्षी लक्षावधी रुपये कमवले जातात. याविषयी पेट्रोल पंपचालक सांगतात, ‘हवा, पाणी आणि स्वच्छतागृह हे विनामूल्य उपयोगासाठीच आहे’; पण प्रत्यक्षात तेथील कर्मचारी या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देत नाहीत. प्रत्येक पेट्रोल पंपावर एक तक्रार नोंदवही, तसेच सूचना पेटी ठेवलेली असते. यामध्ये ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात. सूचनापेटीमध्ये उपरोल्लेखित सुविधा विनामूल्य मिळाव्यात, याविषयीची सूचना करता येईल. ग्राहकांनी स्वतःच्या हक्कांसाठी तक्रारी प्रविष्ट करायला हव्यात. तसे केल्याविना हे पेट्रोल पंपचालक वठणीवर येणार नाहीत, हे निश्चित ! ग्राहकांनीच त्यांच्या हक्कांसाठी आता झटण्याची वेळ आली आहे. ग्राहकराजा जागा हो !

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा